भविष्यातील पाण्याच्या दुर्भिक्षाचे संभाव्य संकट लक्षात घेऊन बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याने आपल्या पाणी फाउंडेशनद्वारे 2016 पासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेला श्रमदानाने तलाव निर्मितीस प्रोत्साहित केले. असाच कांहीसा प्रकार हुक्केरी तालुक्यात घडला आहे.
हुक्केरी तालुक्यातील शाहबंदर पंचायतीमधील गुटगुद्दी हे एक मागासलेले आडवाटेचे अवर्षणग्रस्त छोटेसे गांव, पण येथील महिलांनी श्रमदानाने खोदलेल्या तलावामुळे अल्पावधीत गुटगुद्दी गावाचे नांव सगळीकडे नावाजले जात आहे. तलावासाठीचे गुटगुद्दी गावच्या महिलांचे हे श्रमदान इतर गावातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गुटगुद्दी येथील कांही महिलांनी आपल्या गांवातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष दुर करण्यासाठी नजीकच्या जंगलात तलावासाठी योग्य जागा शोधून काढली. जागा निश्चित होताच त्यांनी जेष्ठ सर्वोदयी समाजसेवक शिवाजी कागणीकर व राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग व शाहबंदर पंचायतीमार्फत उद्योग खात्री योजनेअंतर्गत तलाव मंजूर करून घेतला. त्यानंतर गेल्या 3 महिन्यांपासून अडव्याप्पा कुंबरगी व कविता मुरकुटे या कार्यकर्त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गांवापासून 3 कि. मी. दूर जंगलात चालत जाऊन जवळपास 200 महिला व 50 पुरुषांनी श्रमदानाने तलाव खोदण्याचे काम हाती घेतले.
गुटगुद्दी येथील समस्त महिलांनी गावातील पुरुषांच्या मदतीने आतापर्यंत सुमारे 4 ते 5 फूट इतकी तलाव खुदाई केली आहे. या जमिनीत 5/6 फूटापेक्षा मोठमोठाले दगड निघाले. यावेळी पंचायतीकडून व सरकारी इंजिनिअरकडून हे दगड फोडण्यासाठी मशिनीची विचारणा झाली. परंतु महिलांनी स्पष्ट नकार देऊन “हा आमचा तलाव आहे आणि हे दगड सुद्धा आम्हीच फोडणार” असे ठामपणे सांगत खडतर परिश्रमाने ते दगड फक्त फोडून टाकले नाहीत तर त्यांचा तलावाच्या सभोवताली बांधबंदीस्तासाठी मोठ्या सफाईने वापर केला. सद्धा या सुंदर तलावाचे क्षेत्रफळ जवळपास 1 एकर भरेल इतकी असून उंची सुमारे 15 फूट आहे. कायक बंधू, कमलव्वा करगुप्पी, लगमव्वा पूजेरी, कमलव्वा कोलनाईक, संतेगी लंक्यापगोळ, नागव्वा मठद, होळव्वा कोळनाईक, रेणूका गटगार, चंद्रव्वा करगुप्पी, यल्लव्वा नाईक, तंगेव्वा गटगार, कमलव्वा करगुप्पी व प्रकाश मुकनार यांनीसुद्धा जीव ओतून काम पूरे करण्याकडे लक्ष दिले आहे. तलाव पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड महिना काम अपेक्षित आहे.
गुटगुद्दी गांवातून तलावाच्या कामावर जाणारा कच्चा रस्ता हा वनविभागाच्या जंगलातून जातो आणि पुढे याच रस्त्यामार्गे केंचानट्टी व जुमनाळला लोक पायी जातात. तेंव्हा जर या पायवाटेचा रस्ता झाला तर लोकांना सोईचे होईल. तसेच हे रस्त्याचे काम झाल्यास सदर जंगलात वनविभागा मार्फत आणखीन तलाव खोदाईची परवानगी आम्हा लोकांना मिळाले तर जलसंधारणाचे कामही होईल व जंगलातील पशूपक्षांना पाण्याची सोयही होईल, असे राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमाना सांगितले. या तलावाच्या कामाला शाहबंदर पंचायतीतर्फे अधिकारी, पीडीओ, इंजिनिअर, हुक्केरी तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी व इंजिनिअरनी वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन सामाजिक संस्था, जीवन विवेक प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगांव, देशासाठी एक तास व शालीनी फौंडेशन या सामाजिक संस्थानी भेटी देऊन तलावाच्या बाबतीत महिलांच्या कामाची प्रशंसा केली आहे.