बेळगाव शहराच्या विकासात बट्याबोळ आणि स्मार्ट सिटी योजनेतील गैरप्रकार अनेकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. स्वच्छ बेळगाव आणि सुंदर बेळगाव ही घोषणा फोल ठरत आहे. शहरातील अनेक रस्ते अर्धवट खोदाई करून टाकण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे हे रस्ते कधी होणार असा सवाल वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. मात्र याचे सोयरसुतक प्रशासनाला आणि स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. विकास कमी आणि भकास जास्ती अशी अवस्था बेळगाव शहराची झाली आहे. स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत बेळगावचा समावेश झाला असला तरी विकासाच्या कामात मात्र शेवटच्या क्रमांकावर बेळगाव असेल असे जाणकारातून सांगण्यात येत आहे.
मागील वर्षभरापासून रस्त्यांची कामे अर्धवट टाकण्यात आले आहेत. त्यामुळे एकच संताप व्यक्त होत आहे. भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेचे काम कधी एकदा पूर्ण होईल आणि नागरिकांची समस्या कधी संपेल याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यानच्या काळात विकासाला गती देण्यापेक्षा भकासाला अधिक प्राधान्य मिळत आहे.
एखादा रस्ता पूर्ण झाला तर तो परत खोदाई करून त्याची वाट लावण्यात येत आहे. त्यामुळे एखादा रस्ता पूर्ण झाला तर तो परत खोदाई करू नये अशीच मागणी जोर धरू लागली आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून जी पावले उचलायला हवी होती ती उचलण्यात येत नसल्याने आणि अनेक लोकप्रतिनिधींच्या आडकाठीमुळे कामे रखडली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.