साड्या खरेदी योजनेअंतर्गत चुकीची माहिती देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात तसेच विणकरांच्या वीज पुरवठ्याचे खाजगीकरण केले जाऊ नये या मागणीसाठी आज बेळगांव जिल्हा विणकर संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव जिल्हा विनकर संघाचे अध्यक्ष पांडुरंग धोत्रे आणि सरचिटणीस परशुराम ढगे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी आंदोलन छेडून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. लॉक डाऊनमुळे अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलेल्या विणकर बांधवांना दिलासा देताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरकारद्वारे विणकरांनी तयार केलेल्या साड्या खरेदी करण्याचा आदेश दिला होता तथापि सरकारी अधिकाऱ्यांनी या साड्या खरेदी संदर्भात चुकीची माहिती दिली.
संपूर्ण राज्यातील विणकरांच्या साड्या सात कोटी रुपयांमध्ये सरकारला खरेदी करता आल्या असत्या परंतु अधिकाऱ्यांनी साड्या खरेदीसाठी 900 कोटी रुपये लागणार असल्याचा खोटा अहवाल सादर केला. परिणामी सरकारकडून साड्या खरेदी रद्द गाड्या आणि विणकर समाज पुनश्च संकटात सापडला. याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली करण्याबरोबरच सरकारने विणकरांच्या साड्या खरेदी कराव्यात.
विणकर बांधवांवर फार पूर्वीपासून अन्याय होत आला आहे. त्यांना कोणत्याही सरकारी सुविधा सोयीसुविधा उपलब्ध नाही. विणकर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे साड्या विणण्यासाठी माफक दरात वीज उपलब्ध होत होती. आता या वीज पुरवठाचे खाजगीकरण केले जाणार आहे हे खाजगीकरण झाल्यास विणकर उद्योजकांचे कंबरडेच मोडणारा असून विणकर क्षेत्र धोक्यात येणार आहे. तेंव्हा विणकर क्षेत्राशी निगडीत वीज पुरवठ्याचे खाजगीकरण केले जाऊ नये. प्रत्येक विणकर कामगाराला सरकारच्या कामगार खात्याकडून लेबर कार्ड अर्थात कामगार ओळखपत्र दिले जावे आणि संबंधीत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशा आशयाचा तपशील विणकर संघाच्या निवेदनात नमूद आहे.
यासंदर्भात बोलताना बेळगाव जिल्हा विणकर वेदिके अर्थात संघाचे अध्यक्ष पांडुरंग धोत्रे यांनी कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे विणकर समाज बांधवांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे सांगितले. सर्व उद्योग बंद असल्यामुळे विणकरबांधवांवर भाजीपाला विकणे, गवंडी काम करणे अशी काम करण्याची वेळ आली, बऱ्याच जणांनी उसनवार पैसे घेऊन आपला उदरनिर्वाह केला. ही परिस्थिती असताना सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे विणकर बांधवांना मोठा फटका बसला आहे. लॉक डाऊनमुळे विक्री न झालेल्या विणकरांच्या साड्या खरेदी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि साड्या खरेदी करण्याचा आदेशही दिला होता. अवघ्या 60 कोटी रुपयांमध्ये राज्यभरातील विणकरांच्या साड्या विकल्या गेल्या असत्या परंतु संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी साड्या खरेदीसाठी 900 कोटी रुपये खर्च येणार असल्याची चुकीची माहिती दिल्यामुळे सरकारकडून साड्या खरेदी रोखली गेली.
परिणामी विणकर क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी आणि सरकारने विणकरांच्या साड्या खरेदीस पुढाकार घ्यावा असे धोत्रे यांनी सांगितले. त्याप्रमाणे विणकर क्षेत्राला उपलब्ध असणाऱ्या वीजपुरवठ्याचे जे खाजगीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे हे क्षेत्र धोक्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज निवेदन सादर करतेवेळी बेळगांव जिल्हा विणकर संघाचे अध्यक्ष धोत्रे सरचिटणीस परशुराम ढगे, रमेश सोनटक्के, श्रीनिवास टालुकर नारायण कामकर, संजय इटणाळ आदींसह वडगांव, खासबाग येथील साडी उद्योजक आणि विणकर बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून आपल्या मागण्या मांडल्या.