नेहमीच या ना त्या कारणाने प्रसिद्धीसाठी हापापलेल्या वाटाळ नागराज याने मराठा विकास प्राधिकरणाबाबत गरळ ओकण्यास सुरुवात केली असून सुवर्णसौधजवळ जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान पोलिसांनी याला वाटेतच अडविले आहे.
राज्यातील घडामोडी असोत किंवा जिल्ह्याशी निगडित, या वाटाळ नागराजकडून सातत्याने आंदोलन करण्यात येते. कसलीही ताळतंत्र नसलेली वक्तव्ये करून प्रसिद्धी झोतात येणाऱ्या वाटाळ नागराज याने मराठा विकास प्राधिकरणाला विरोध दर्शवत बेळगावमध्ये येऊन सुवर्णविधानसौध परिसरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
वाटाळ नागराज, स. रा. गोविंद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ अटक केली. सुवर्ण विधानसौधजवळ धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत असणाऱ्या वाटाळ नागराजाच्या डावाचे पोलिसांनी तीनतेरा केले.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा विकास प्राधिकरणाला विरोध दर्शवत येत्या ५ डिसेंबर रोजी कर्नाटक बंद ची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाटाळ नागराज यांच्यासह काही टोळक्यांनी धरणे आंदोलनाचा डाव आखला होता. परंतु नुकतेच पोलीस प्रशासनाने सुवर्णसौध परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांना बंदी घातली आहे. पोलिसांनी वाटाळ नागराज आणि त्याच्या साथीदारांना टोलनाक्याजवळच अडविल्याने पोलिसांच्या विरोधातही टोलनाक्याजवळ या टाळक्यांनी गोंधळ माजविला. त्यामुळे आजच्या वाटाळ नागराजच्या आंदोलनाचा पोलिसांनीच फज्जा उडविला.
सरकारने घोषित केलेल्या मराठा विकास प्राधिकरणाला आपला विरोध असून महाराष्ट्रातील श्रीमंतांना सुवर्णसौध विकण्याचा कर्नाटक सरकारचा मानस आहे. कर्नाटकात कन्नडिगांचे सरकार नसून मराठ्यांचे सरकार असल्याचे वाटाळ नागराज याने बरळले आहे.
पोटनिवडणूक नजरेसमोर ठेऊन ही घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज असून तेथे मराठा समाजासाठी कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. परंतु कर्नाटक सरकारने मराठा प्राधिकरण स्थापनेची घोषणा करून ५० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही त्याने म्हटले आहे. वाटाळ नागराज हे व्यक्तिमत्व फालतूची बडबड करणारे आहे. आपल्या अर्थहीन बोलण्यामुळे नेहमीच प्रसारमाध्यमात हा चेष्टेचा विषय बनला जातो. आज पुन्हा अर्थहीन वक्तव्य करून पुन्हा आपल्या बुद्धीची क्षमता या वाटाळ नागराजने दाखवून दिली आहे.
मराठा समाज आणि मराठी भाषिक या दोन भिन्न गोष्टी आहेत. कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. परंतु प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांची भाषा ही मराठीच आहे असे नाही. अनेक मराठा समाजातील नागरिक हे कन्नड भाषिकही आहेत. परंतु केवळ राजकारण आणि प्रसिद्धी यासाठी कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता कन्नड संघटना आणि वाटाळ नागराज सारख्या व्यक्तींनी केलेला विरोध हा हास्यास्पद म्हणावा लागेल.