दिवाळीनिमित्त भांदुर गल्ली येथील बालगोपाळांनी श्री स्वराज्य मित्र मंडळाच्या नेतृत्वाखाली यंदा तामिळनाडूतील वेल्लोर किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे.
भांदुर गल्ली येथील वेल्लोर किल्ल्याची ही प्रतिकृती पाहण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी होत आहे. तामिळनाडू येथील वेल्लोर शहरानजीक असणाऱ्या श्री वेल्लोर किल्ल्याची ठळक वैशिष्ट्ये भांदूर गल्ली येथील बाळगोपाळांनी आपल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीत हुबेहूब साकारले आहे.
अतिशय सुबक अशा या वेल्लोर किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये किल्ल्याचे बुरुज, प्रशस्त, खंदक, भव्य जनघंटेश्वर मंदिर, जलकुंड, दारु कोठार, गंगा विहीर आदी ठळक वैशिष्ट्ये दाखविण्यात आली आहेत. हा किल्ला सध्या या परिसरातील एक आकर्षण ठरला आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी नगरसेविका रेणू मुतकेकर व श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते वेल्लोर किल्ल्याच्या या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले.
श्री वेल्लोर किल्ल्यासंदर्भात तेराव्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोरला वेढा दिला होता. त्याचप्रमाणे वेल्लोर किल्ला जिंकण्यासाठी साजरा व गोजरा हे दोन नवे किल्ले शिवरायांनी बांधलेले होते. 1678 ते 1707 या कालावधीमध्ये 133 एकर जमिनीमध्ये विस्तारलेला हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता वगैरे किल्ल्याच्या इतिहासाची आणि किल्ल्याची तपशीलवार माहिती प्रथमेश चौगुले या मुलाने बेळगाव लाईव्हला दिली. सर्वजण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवितात काहीतरी वेगळे करायचे म्हणून यंदा आम्ही दक्षिण भारतातील हा किल्ला बनविला आहे, असेही प्रथमेशने नमूद केले.
वेल्लोर किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी प्रथमेश चौगुले यांच्यासह वरद मेणसे, समर्थ मुतकेकर, तेजस मुतकेकर, मितेश चौगुले, संकल्प चौगुले, मेघन मुतकेकर, स्वयम् मुतकेकर, मंदार मुतकेकर, निखिल चौगुले, पार्थ मोरे व राजू मुतकेकर या मुलांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
म्हणून आम्ही बनवलाय दक्षिण भारतातील हा वेल्लोरचा किल्ला-भांदूर गल्ली बेळगाव येथील स्वराज्य मित्र मंडळाच्या बालचमुंचा आकर्षक किल्ला-या किल्ल्याची माहिती देतोय प्रथमेश चौगुले-
https://www.facebook.com/375504746140458/posts/1270970979927159/