बेळगाव स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक आणि बेळगाव शहर बसस्थानकाचा प्रवाशांच्या सोयीसाठी विकास करण्यात येत आहे. या दोन्ही बस्तस्थानकांना जोडण्यासाठी भुयारी मार्ग म्हणजेच अंडरपास निर्माण करण्यात येत आहे.
यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका बाजूचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. आणि रस्त्याच्या एका बाजूच्या रस्त्यावर खोदाईचे काम हाती घेतले आहे. या कामाला तब्बल दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. संथगतीने सुरु असलेल्या या कामामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकासमोर सुरु असलेल्या या कामाला पूर्णत्व मिळण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेटी दिल्या आहेत. परंतु शहरातील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेली कामे ज्या पद्धतीने ठप्प झाली आहेत, त्याचपद्धतीने याठिकाणचीही कामे ठप्प झाली आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच आमदार अभय पाटील यांनीही या कामाची गती वाढवून हे काम त्वरित पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती. परंतु या अधिकाऱ्यांना या सूचनांचा विसर पडलेला दिसतो आहे.
बेळगावमध्ये अनेकवेळा राज्य परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी भेटी दिल्या आहेत, त्यांना या कामाबद्दल कल्पनाही असेल. परंतु गेल्या २ वर्षांपासून ठप्प असलेल्या या कामकाजाबद्दल त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. बेळगावच्या राजकारणावर अनेक वेळा अनेक प्रकारची वक्तव्य करताना लक्ष्मण सवदी निदर्शनास आले आहेत. परंतु परिवहन खात्यातील या महत्वाच्या मुद्द्यावर कोणतेही भाष्य करताना दिसून आले नाही, हे विशेष.
शहराच्या मध्यवर्ती भागात आणि शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असा प्रकार पाहून परगावाहून बेळगावमध्ये येणारी जनता संभ्रमात पडल्याशिवाय राहणार नाही. शिवाय शहराच्या प्रवेशावरच अशी अवस्था असेल, तर संपूर्ण शहराची अवस्था काय असेल, याचा मात्र नक्कीच विचार हि जनता करेल. एकंदर परिस्थिती पाहता या कामकाजाकडे अधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे, हे नक्की.
कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेली बेळगाव सिटी स्मार्ट कधी होणार याची बेळगावकर आवासून वाट पहात आहेत.