एकीकडे पर्यावरण संरक्षणासाठी झाडे वाचविण्याचे आवाहन केले जात असताना राज्याचे पोलीस महासंचालक येणार म्हणून स्वच्छतेच्या नांवाखाली झाडांना इजा पोहोचविण्याचा प्रकार आज शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तालय कार्यालय परिसरात घडला.
राज्याचे पोलिस महासंचालक येणार म्हणून आज सकाळी पोलिस आयुक्तालय कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. मात्र ही स्वच्छता करण्यात आल्यानंतर जमा झालेला कचरा एका झाडाखाली एकत्र करून पेटवून देण्यात आला.
एकीकडे झाडे वाचवा असे आवाहन केले जात असताना कचऱ्याचा जाळ करून एका झाडाला इजा पोहोचण्याचा हा प्रकार पाहून या ठिकाणी ये-जा करणाऱ्या पर्यावरणप्रेमीमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत होती. तसेच पोलिस खात्याकडून या पद्धतीची कृती अपेक्षित नसल्याचे मत देखील व्यक्त होताना दिसत होते.
एखाद्या झाडाच्या बुंध्याशी कचरा गोळा करून पेटवून देणे हा प्रकार तसा नवीन नाही परंतु यामुळे संबंधित क्षतीग्रस्त होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
तेंव्हा संबंधित खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना केरकचऱ्याची झाडापासून दूर विल्हेवाट लावण्याची सक्त सूचना द्यावी, अशी मागणी केली जात आहे.