हेल्मेट सक्तीसह वाहन कागदपत्रे तपासणीच्या नांवाखाली बेळगांव रहदारी पोलिसांकडून शहराच्या ठरावीक भागात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असून याचा बेळगांव शहरातील व्यापार आणि उद्योगधंद्यांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप केला जात आहे.
बेळगांव रहदारी पोलिसांकडून सध्या हेल्मेट शक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी आणि कागदपत्राच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु ही मोहीम शहराच्या सर्व भागांमध्ये न राबविता हॉटेल रामदेव, सिव्हिल हॉस्पिटल रोड, चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, संचयनी सर्कल, गोगटे सर्कल, हिंडलगा गणपती मंदिर अशा ठराविक ठिकाणी राबविले जात आहे. या मार्गावर गोवा आणि महाराष्ट्रातून बेळगाव शहरात खरेदी अथवा कामानिमित्त येणाऱ्या वाहनांची रहदारी असते. गेल्या बऱ्याच दिवसापासून रहदारी पोलीस हेल्मेट सक्ती आणि वाहन कागदपत्राच्या तपासणीचे कारण पुढे करून गोवा व महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप केला जात आहे.
बेळगांव सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील शिनोळीसह चंदगड तालुक्यातील लोक उद्योगधंद्यानिमित्त अथवा बाजारपेठेतील खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बेळगांव शहरात येत असतात. परंतु अलीकडे कांही दिवसांपासून पोलिसांच्या भीतीमुळे या लोकांनी बेळगांव शहरात येणे बंद केले आहे. चंदगड परिसरातील व्यापारी आणि उद्योजक बेळगाव शहराबाहेरील गणेशपुर, हिंडलगा, बॉक्साइट रोड आदी आदी ठिकाणी आपली खरेदी करून अथवा आपले काम आटपून परस्पर माघारी जात आहेत. पोलिसांच्या दहशतीमुळे ते बेळगांव शहराकडे फिरकत नसल्यामुळे शहरातील बाजारपेठ आणि उद्योगधंद्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे रहदारी पोलिसांकडून कायद्याच्या अंमलबजावणीच्या नांवाखाली जाणीवपूर्वक गोवा आणि महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तरी शहराच्या पोलीस आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.