आरोग्य खात्याने गेल्या 17 नोव्हेंबरपासून शहरातील महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी हाती घेतली आणि यामध्ये 7 प्राध्यापकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले होते. आता विद्यार्थ्यांच्या तपासणीमध्ये आतापर्यंत 1142 पैकी 3 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बेळगांव शहरातील 13 महाविद्यालयांमधील 1,142 विद्यार्थी -विद्यार्थिनींची आत्तापर्यंत कोरोना तपासणी करण्यात आली असून यापैकी 3 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. या तीनही विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यातील महाविद्यालय केल्या 17 नोव्हेंबर पासून पूर्ववत सुरू झाली असली तरी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी कोरोना तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.
त्यानुसार शहरातील प्रत्येक महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली आणि आता विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे.
शहरातील महाविद्यालयांमध्ये सुमारे 2,500 प्राध्यापक आणि कर्मचारी काम करत आहेत. आरोग्य खात्यातर्फे प्रत्येक महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणी केंद्रे सुरू करून या सर्वांची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये 7 प्राध्यापकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. प्रारंभी प्राधान्याने प्राध्यापकांसाठी महाविद्यालयांमध्ये तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे विद्यार्थ्यांना सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी कोरोना तपासणी केंद्र अथवा खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत होता.
त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना बराच मनस्ताप सहन करावा लागत होता. यासंदर्भात आवाज उठवण्यात आल्यानंतर आरोग्य खात्याकडून प्रत्येक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोरोना तपासणी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे त्यासंदर्भातील खबरदारी आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.