भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव येथील जिल्हा पातळीवरील कार्यालयाच्या निर्माणासाठी ३० गुंठे जागा बेळगाव नगरविकास प्राधिकरणाने उपलब्ध करून देण्याची सूचना राज्य मंत्री मंडळ बैठकीत देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस भवन पाठोपाठ भाजपचेहि कार्यालय लवकरच उभे राहण्याची शक्यता आहे. या नियोजित कार्यालयासाठी जागा मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने जिल्हा पालकमंत्री तसेच जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी प्रयत्न केले आहेत.
गोकाक येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात रमेश जारकीहोळी यांच्या पक्षनिष्ठेबद्दल कौतुक करण्यात आले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या जारकीहोळी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. भाजपमध्ये जास्त दिवस टिकाव न लागण्याचेही हेवेदावे करण्यात आले होते. परंतु या सर्व गोष्टींना मागे सारत आपली पक्षनिष्ठा सिद्ध करत रमेश जारकीहोळी यांनी पक्ष बळकटीसाठी अनेक प्रयत्न केले असल्याचे निदर्शनास येत आहे.
रमेश जारकीहोळी हे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी या पक्षासाठीही प्रयत्न केले होते. बेळगावमध्ये काँग्रेस भवन उभारणीतही त्यांचाच वाटा होता. या पाठोपाठ भाजप प्रवेशानंतरही त्यांनी भाजपच्या हिताच्या दृष्टीने आणि पक्ष संघटनेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपामधूनच होत असलेल्या त्यांच्यावरील टीकेला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत. काँग्रेस पाठोपाठ आता बेळगावमध्ये भाजपाचेही कार्यालय लवकरच उभारण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे स्वतःचे कार्यालय असले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुचविले आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार करून जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा मांडला होता.
या मुद्द्यावर विचारविनिमय करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपच्या स्वतःच्या बेळगाव जिल्हा पातळीवरील कार्यालयासाठी ३० गुंठे जागा उपलब्ध करून देण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये ही जागा उपलब्ध करून देण्यापासून ते जिल्ह्यात कार्यालय उभारणीपर्यंत लक्ष वेधून राहणार आहे.