शहरात दोन ठिकाणी हॉकर्स झोन तर 10 रस्ते नॉन -हॉकर्स झोन

0
2
Mahapalika city corporation
 belgaum

बेळगांव महापालिकेतर्फे शहरातील शहरातील शहरातील नरगुंदकर भावे चौक आणि शहापूर दाणे गल्ली येथील खुल्या जागा फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत, तर एसपीएम रोड, खडेबाजार -शहापूर, काँग्रेस रोड आदी ठराविक 10 रस्त्यांवर फेरीवाल्यांना व्यवसाय थाटण्यास बंदी घालण्यात आली आहे.

शहरातील विशेष करून बाजारपेठेतील प्रत्येक रस्त्यावर दुतर्फा भाजीविक्रेते फळविक्रेते कपडे विक्रेते याव्यतिरिक्त विविध साहित्य विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची गर्दी वाढत चालली आहे. बाजारपेठेतील फेरीवाल्यांमुळे वादावादी आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी सातत्याने होत असते. मात्र फेरीवाल्यांवर कारवाई न करता त्यांचे संरक्षण करण्याचा कायदा केंद्र शासनाने अंमलात आणला आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगांव महापालिकेने अलीकडेच हॉकर्स झोन आणि नॉन -हॉकर्स झोनची घोषणा केली आहे. शहरातील नरगुंदकर भावे चौक आणि दाणे गल्ली शहापूर येथे महापालिकेचा खुल्या जागा असून भाजीविक्रीसह विविध व्यवसाय करण्यासाठी सदर जागा योग्य आहेत. शिवाय या दोन्ही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे. वाहतुकीस अडथळाही होत नसल्याने या दोन्ही जागांना हॉकर्स झोनचा दर्जा देण्यात आला असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

 belgaum

एसपीएम रोडपासून शहापूर खडेबाजार ते बॅ. नाथ पै चौकमार्गे येळ्ळूर क्रॉसपर्यंतचा रस्ता नॉन -हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच शिवाजी उद्यान शहापूरपासून ते बसवेश्वर चौक अर्थात गोवावेसपर्यंतचा महात्मा फुले रोड, टिळकवाडी येथील देशमुख रोड, हरी मंदिर समोरील अनगोळ मुख्य रस्ता, महांतेशनगर येथील मुख्य रस्ता, न्याय मार्ग ते धर्मनाथ चौकमार्गे श्रीनगर उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता, बसवेश्वर उड्डाणपूल ते तिसरे रेल्वे गेटपर्यंतचा खानापूर रोड, काँग्रेस रोड, अशोकनगर डबल रोड ते अशोकनगर समुदाय भवन जवळचा पादचारी रस्ता आणि न्याय मार्ग ते वीरभद्र चौकमार्गे धर्मनाथ चौकापर्यंतचा रस्ता नॉन -हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

शहरातील गर्दीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांसाठी वेळेचे बंधन घालण्यात येणार आहे. फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून रीतसर व्यवसाय परवाना घेणे अनिवार्य आहे. व्यवसायाच्या ठिकाणी ओळखपत्र घालणे बंधनकारक असून महापालिका आणि रहदारी पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे देखील बंधनकारक असल्याची नियमावली तयार करण्यात आली आहे.

शहरातील वाढती वाहतूक आणि फेरीवाल्यांमुळे निर्माण होणारा अडथळा लक्षात घेऊन वरीलप्रमाणे हॉकर्स आणि नॉन -हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भात कोणतीही हरकत असल्यास 15 दिवसाच्या आत लेखी तक्रार करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.