कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शबरीमला (केरळ) येथील श्री आय्याप्पा स्वामी दर्शनासाठी आता कोरोना तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. कर्नाटकातील धर्मादाय खात्याने शनिवारी यासंबंधी मार्गदर्शक सूची जारी केली असून केरळ सरकारच्या सूचनेनुसार दर्शनासाठी जाण्याआधी वेबसाईटमध्ये नांव नोंदणी करणे सक्तीचे आहे.
शबरीमलाला येण्यापूर्वी 48 तास आधी कोरोना तपासणी करणे सक्तीचे आहे. ज्या भाविकांनी तपासणी केलेली नसेल अशा भाविकांची अँटीजन्ट टेस्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्याचा खर्च संबंधितांना करावा लागणार असून 10 वर्षाखालील मुलांना आणि 60 ते 65 वर्षावरील वृद्धांना आजारपणाची लक्षणे आढळल्यास प्रवेश दिला जाणार नाही. आयुष्यमान कार्ड, बीपीएल कार्ड आदी कार्डधारकांनी यात्रेदरम्यान सदर कार्ड आपल्यासोबत ठेवावे. तुपाचा अभिषेक, पंपा नदी स्नान आणि शबरीमलामध्ये रात्रीचा मुक्काम, पप्पा आणि गणपती कोविलला यंदा अनुमती नाही.
केरळ सरकारच्या सूचनेनुसार दर्शनासाठी जाण्याआधी वेबसाईट मध्ये नांव नोंदणी करणे अनिवार्य आहे. शबरीमलाला जाणाऱ्या भाविकांनी https://sabarimalaonline.org या संकेतस्थळावर नांव नोंदणी करायची आहे. ज्या भाविकांना अनुमती दिली जाईल, त्यांनाच दर्शनासाठी मुभा असणार आहे. प्रारंभी दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश असणार आहे. त्यानंतर ही संख्या रोज 2 हजार करण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.