बेळगांवमधील चित्रकार आणि छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध छायाचित्रकार संजय लद्दड यांनी “स्टुडिओ आर्केन”ची स्थापना केली आहे. या अंतर्गत चित्रकार व छायाचित्रकार या स्टुडिओमध्ये आपल्या चित्रकृती व छायाचित्रे मांडू शकतात. या उपक्रमाचा शुभारंभ आज सोमवारपासून झाला आहे.
छायाचित्रकार संजय लद्दड यांच्या स्टुडिओ आर्केन अंतर्गत आजपासून येत्या 22 नोव्हेंबर 2020 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत अग्निशमन दल कार्यालयासमोरील तिसरा मजला बामणे कॉम्प्लेक्स येथे चित्रकृती व छायाचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. सदर प्रदर्शनात चित्रकार महेश होनुले, शिरीष देशपांडे, शिल्पा खडकभावी, सचिन उपाध्ये, बाळू सदलगे, चंद्रशेखर रांगणेकर, छायाचित्रकार किरण कुलकर्णी, डाॅ. तेजराज काळे, निरंजन संत, हेमंत कुट्रे, मिलिंद पावशे, राजेश शेळके व स्वतः संजय लद्दड यांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
स्टुडिओ आर्केन अंतर्गत बेळगांव शहर व जिल्ह्यातील चित्रकार आणि छायाचित्रकार आपल्या चित्रकृती व छायाचित्रे मांडू शकतात. बेळगांवमध्ये अनेक कलाकार आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने स्टुडिओ आर्केनमध्ये ज्येष्ठ कलाकार नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करतील.
कलाकारांसाठी हा स्टुडिओ वर्षातील 365 दिवस खुला असेल. स्टुडिओ आर्केनसंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 6362306082 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.