महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शहरातील सरकारी कोरोना तपासणी केंद्रमधील अहवाल तात्काळ मिळण्याची व्यवस्था करावी. तसेच प्रत्येक महाविद्यालयात कोरोना तपासणीची व्यवस्था केली जावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव व शिल्पा केंकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव आणि शिल्पा केंकरे यांनी आज बुधवारी सकाळी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे उपरोक्त मागणी केली. सरकारच्या आदेशावरून सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी कोरोना तपासणी अहवालाची सक्ती करण्यात आली आहे.
यासाठी शहरात विविध 14 ठिकाणच्या केंद्रांमध्ये कोरोना तपासणीची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि बहुतांश विद्यार्थ्यांना आणि पालकांना या केंद्रांची माहिती नसल्यामुळे तसेच या केंद्रातील अहवाल मिळण्यास तीन-चार दिवस लागत असल्यामुळे सध्या जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. याठिकाणी कोरोना तपासणीचा अहवाल तात्काळ मिळत असला तरी गर्दीमुळे गैरसोय आणि विलंब होत आहे.
महाविद्यालयात लवकरात लवकर हजेरी लावायची असल्यामुळे बरेच जण इस्पितळातकडे धाव घेत आहेत. तथापि नेहमीप्रमाणे खाजगी हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची अक्षरशः लूट केली जात आहे. याठिकाणी कोरोना तपासणीच्या एका अहवालासाठी पालकवर्गाला 2 ते 4 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरकारच्या मोफत असलेल्या कोरोना तपासणी केंद्रातील अहवाल तात्काळ मिळण्याची व्यवस्था केली जावी. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयात वैद्यकीय पथकाची नेमणूक करून गटागटाने विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली जावी, अशी मागणी सुनील जाधव आणि शिल्पा केंकरे यांच्यासह माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.