शेतात रचून ठेवलेल्या भाताच्या दोन गंजी अज्ञातांनी पेटवून दिल्यामुळे सुमारे दीड लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री एस. धामणे (ता बेळगाव) येथे घडली.
आगीत भस्मसात झालेल्या बासमती जातीच्या भाताच्या गंजी बसवान गल्ली, एस. धामणे येथील मनोहर ज्योतिबा बाळेकुंद्री यांच्या मालकीच्या होत्या. सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे. त्या अनुषंगाने मनोहर बाळेकुंद्री यांनी आपल्या शेतातील बासमती भाताची कापणी करून सुमारे 70 पोती भाताच्या दोन गंजी शेतात घातल्या होत्या.
काल रविवारी रात्री सातच्या सुमारास अज्ञातांनी या भात गंजी पेटवून दिल्यामुळे बाळेकुंद्री यांचे सुमारे दीड लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महत्प्रयासाने आग आटोक्यात आणली. गवत गंजिना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाण्याच्या दोन टँकर्सचा वापर करावा लागला.