Thursday, January 9, 2025

/

स्मार्ट सिटीमधील नागरिक दिवसेंदिवस होत आहेत बेजबाबदार

 belgaum

बेळगावच्या विकासाचा आणि स्मार्ट सिटी म्हणून गणल्या जाणाऱ्या या शहराचा विकास नेमका होणार तरी कधी याचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक ठिकाणची जनता स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या नावे ठो मारत असून त्यापाठोपाठ आता अनेक उच्चभ्रु वसाहतीतील नागरिकही स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभाराची री ओढत आहेत.

बेळगावमधील अत्यंत उच्च्भ्रू नागरिकांची वस्ती असणाऱ्या गोवावेस ते आरपीडी रोडवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. स्वतःच्या घरासमोर दररोज येणारे कचरा उचल करणारे वाहन यामध्ये कचरा टाकण्याचे कष्ट अनेक नागरिकांना नकोसे झाले आहेत. शहरातील बऱ्याचशा ठिकाणी कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून जितक्या प्रमाणात प्रशासनाचा बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत आहे

तितक्याच प्रमाणात नागरिकही कारणीभूत आहेत. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतच आहे. अनेक ठिकाणी प्रशासनानेही दुर्लक्ष होते. परंतु प्रशासनाने करून दिलेल्या सोयीचा वापर जनता करायला लागली तर कोणत्याच प्रकारच्या समस्या भविष्यात आपल्याला सतावणार नाहीत.Garbage

शहरातील गोवावेस ते आरपीडी रोडवरील ग्रंथालयाजवळ नागरिकांनी कचरा टाकून घाणीचे साम्राज्य पसरवलेले आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी रोडच्या नामफलकाजवळ कचऱ्याचा भला मोठा ढीग पडला असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातून अनेक चारचाकी वाहनांची ये-जा असते. अनेकवेळा आपल्या कारच्या काचा खाली सरकवून बिनधास्तपणे कचरा याठिकाणी भिरकावण्यात येतो. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या अनेक नागरिकांकडून हि गोष्ट वरचेवर याठिकाणी होत असते. या कचऱ्याच्या ढिगाजवळून जाताना अनेक नागरिकांची कुचंबणा होते. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्याची मागणी येथील स्थानिक जनता करीत आहेत.

शहरातील अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असून, नागरिकांनी आता स्वतःची जबाबदारी ओळखून वागणे हे महत्वाचे आहे. प्रशासनाने करून दिलेल्या सोयीचा योग्य वापर करून आपल्या शहराचे सौन्दर्य अबाधित राखणे हे प्रशासनाइतकेच आपलेही कर्तव्य आहे, याची जाणीव अशा बेजबाबदार नागरिकांना होणे गरजेचे आहे. त्यासोबतच अशा बेजबाबदार नागरिकांसाठी प्रशासनाने कडक कारवाई आणि नियम जाहीर करणे हि बेळगावमधील सध्याची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.