१ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनासंदर्भात रामलिंग खिंड गल्ली येथील कार्यालयात जमा झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. आज केंद्र सरकारच्या विरोधात बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने ठिय्या आनॊदलनाचे आयोजन केले होते. दरम्यान सकाळी ८.३० च्या दरम्यान जमा होत असलेल्या कार्यकर्त्यांना या कार्यालयात थांबण्यापासून पोलिसांनी रोखले. या ठिय्या आंदोलनानंतर हे सर्व कार्यकर्ते मराठा मंदिर येथे आयोजित केलेल्या धरणे कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. परंतु अचानक पोलिसांनी येऊन संपूर्ण कार्यक्रम थांबविला. दरम्यान शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
यावेळी शिवसेनेचे बंडू केरवाडकर बोलताना म्हणाले कि, याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाविषयी आधी पोलीस प्रशासनाला कल्पना दिली होती. कार्यकर्ते एकत्रित येण्यासाठी सकाळी ८.३० चा वेळ दिला होता. त्यानंतर मराठा मंदिर येथे होणाऱ्या धरणे कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण सामील होणार होतो. परंतु याठिकाणी पोलीस येऊन सर्वांना एकत्रित न जमण्यासाठी त्यांनी आग्रह केला. आणि येथे होणाऱ्या ठिय्या कार्यक्रमालाही विरोध केला. परंतु कोणत्याही परिस्थितीत आम्ही शिवसेनेच्या वतीने काळा दिन पाळणारच आणि निषेध नोंदविणाराच असे मत त्यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने सीमाभागावर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही हा निषेध नोंदवत असून पोलिसांच्या दडपशाहीला आम्ही झुकणार नाही. आमचा लढा कायद्याने सुरु आहे. शिवाय लोकशाही मार्गाने आम्ही लढा देत असून त्याचपद्धतीने निषेध नोंदवित आहोत. सीमाप्रश्न सुटेपर्यंत आम्ही असाच निषेध नोंदवत राहू, आणि अशाचपद्धतीने काळा दिन पाळू असा निश्चय उपस्थित शिवसैनिकांनी केला.