टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटचे लोखंडी फाटक आज शनिवारी दुपारी पुन्हा एकदा कोसळले असून सातत्याने कोसळणाऱ्या या धोकादायक फाटकाकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल वाहन चालक तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेट आज दुपारी एकच्या सुमारास उघडण्यात येत असताना ते अचानक कोसळले. एक मालवाहू टेम्पो रेल्वे गेट ओलांडत असताना हा प्रकार घडला. परंतु प्रसंगावधान राखून चालकाने टेम्पो रोखल्यामुळे तो गेटच्या लोखंडी खांबाला धडकून थांबला.
टेम्पो चालकाचे प्रसंगावधान आणि सदैव यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. रेल्वे फाटकाचा खांब रस्त्यावर कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस काही काळ अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. नशीब बलवत्तर म्हणून कोणालाही दुखापत झाली नाही. रेल्वे गेट कोसळले त्यावेळी मार्गावर वाहतुकीची वर्दळ कमी असली तरी नेहमी दुसऱ्या गेटमधून ये -जा करणाऱ्यांना पलीकडे जाण्यासाठी आज दुपारी पहिल्या व तिसऱ्या गेटचा वापर करावा लागला.
साधारण महिन्याभराच्या कालावधी टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटचा हा धोकादायक लोखंडी खांब तिसऱ्यांदा कोसळला आहे. यामुळे गेटच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे विभागाचे दुर्लक्षामुळे वारंवार घडणाऱ्या उपरोक्त धोकादायक प्रकारामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला असल्याची तक्रार वाहनचालक करत आहेत.
तेंव्हा यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.