बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम बेळगांववर देखील झाला आहे. शहर परिसरात काल शनिवारपहाटेपासून निर्माण झालेले ढगाळ व थंडीचे वातावरण आज रविवारी देखील कायम होते.
बेळगांव शहर परिसरात काल पहाटेपासून पडलेल्या थंडीमुळे सर्वांच्याच अंगामध्ये भरलेली हुडहुडी आज देखील कायम होती या पद्धतीने बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदाच बेळगावकर खऱ्या अर्थाने महाबळेश्वरचा अनुभव घेत आहेत.
बेळगांव शहर परिसरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र काल शहरातील किमान तापमान 7.6 अंशावर घसरले होते तर कमाल तापमान 21.3 इतके होते. हवेत मोठ्याप्रमाणात गारठा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे थंडी वाढल्यामुळे स्वेटर, जॅकेट, मफलर व कानटोप्या खरेदीसाठी दुकानात गर्दी दिसून येत आहे.
हवेतील गारठा वाढल्यामुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये सकाळीच नाही तर दुपारी देखील शेकोटी पेटलेल्या दिसत होत्या. सध्या भात कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. शनिवार सकाळपासून वातावरणात बदल झाल्यामुळे भात कापणी व मळणी घातलेल्या शेतकऱ्यांची धांदल उडाली होती.
गेल्या दोन वर्षांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत असून फक्त पावसाळ्यातच नाहीतर हिवाळ्यामध्ये देखील पाऊस पडत आहे. या विचित्र हवामानाचा परिणाम पिकाबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. सध्याच्या ढगाळ आणि थंडीच्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.