सरकार आज सोमवारी शाळा सुरू करण्यासंदर्भात आपला निर्णय जाहिर करणार असले तरी याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून बहुतांश लोकांचा या निर्णयाला विरोध आहे. कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट केंव्हाही धडकू शकते असे तज्ञाने सांगितले आहे. ही वस्तुस्थिती असताना राज्यातील पुनश्च शाळा सुरू करणे म्हणजे भावी पिढीच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
गेल्या कांही दिवसापासून राज्यातील शाळा पुनश्च सुरू करण्यासंदर्भातील सरकारच्या हालचालींना प्रारंभ झाला आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणाखाली आला नसल्यामुळे शिक्षण प्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांचे सध्या शाळा सुरू केल्या जाऊ नयेत असे मत आहे. यासंदर्भात बेळगांवच्या सिटिझन्स कौन्सिलने सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली येत्या जानेवारी 2021 नंतर परिस्थिती पाहून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी देखील सरकारकडे केली आहे.
देशातील कांही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांचे अनुकरण कर्नाटक सरकार करणार असले तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते तेंव्हा सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांसह देशातील तज्ञ मंडळी कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याचे घसा फोड करून सांगत असताना कर्नाटक सरकार मात्र शाळा सुरू करण्याचा आटापिटा करत आहे. याबद्दल जाणकार मंडळींमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो म्हणून कोरोनाचे संकट असतानाच ज्याप्रमाणे दारू दुकाने खुली करण्यात आली. तोच प्रकार शाळांच्या बाबतीत तर होत नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट होण्याबरोबरच लिकर लॉबीच्या दबावामुळे कोरोना विषाणू संसर्गकडे दुर्लक्ष करून राज्यातील दारू दुकाने सुरू करण्यात आली हे सर्वश्रुत आहे. सध्याची आपली शिक्षण व्यवस्था पाहता या क्षेत्रांमधून देखील मद्य उत्पादन आणि विक्री प्रमाणे मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होत असते. सरकारला या क्षेत्रांमधूनही चांगला महसूल मिळत असतो. हा महसूल आणि मद्यसम्राटांप्रमाणे राज्यातील शिक्षण सम्राट आणि संस्थांकडून येत असलेला दबाव यासाठीच राज्यातील शाळा पुनश्च सुरू करण्यासाठी बहुदा सरकार प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शैक्षणिक संस्थांद्वारे वारेमाप पैसे मिळण्याच्या प्रक्रियेत खंड पडल्याने राज्यातील बहुतांश शिक्षण संस्था चालक नाराज झाले आहेत. राज्यातीलच नाही तर बेळगांव शहरातील शिक्षण संस्था पैसा कमावण्यासाठी सर्वसामान्य पालक वर्गाची शैक्षणिक फीच्या नांवाखाली कशी पिळवणूक करतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी अशा प्रकारांना खतपाणी घालण्यासाठीच सरकार शाळा सुरू करत आहे असा आरोपही केला जात आहे.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर एकीकडे “जब तक दवाई नही, कब तक ढिलाई नही” अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असताना दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट केंव्हाही धडकू शकते हे माहीत असूनही कर्नाटक सरकार शाळा सुरु करत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शाळेला जाणारी आपली जी भावी पिढी आहे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी डिसेंबर -जानेवारीमध्ये अंदाज घेऊन त्यानंतर शाळा सुरू केल्या जाव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहेत.