कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असून शाळा सुरू झाल्यानंतर शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरविले जाणार आहे. या पद्धतीने आठवड्यातील सहा दिवस मुलांना पूर्णवेळ शाळेत जावे लागणार आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस शालेय शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असतो. परंतु यंदा कोरोनामुळे अर्धे वर्ष उलटून गेले तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत. कांही राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे आता कर्नाटकातही शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. कमी दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असल्यामुळे अभ्यासक्रमात कपात करण्यास बरोबरच शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्याचा विचार केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शालेय अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय झाल्यास मार्चअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा तसेच महत्त्वचा अभ्यासक्रम शिकवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. शिक्षण खात्याच्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शुक्रवार पूर्ण दिवस शाळा तर शनिवारी सकाळच्या सत्रात शाळा घेतली जात होती. परंतु आगामी काळात शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवली जाणार आहे. मात्र शिक्षण खात्याच्या या निर्णयास पालकांचा विरोध होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
यापूर्वी मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती त्यावेळी दिवस भरून काढण्यासाठी शनिवारी पूर्ण दिवस शाळा घेण्यास विरोध दर्शविण्यात आला होता. तथापी यावेळी कोरोना प्रादुर्भावाचे संकट असले तरी शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरविणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी व्यक्त केले आहे. तसेच या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.