मराठा विकास प्राधिकरण स्थापनेची घोषणा ही भाजपची निवडणूक रणनीती असल्याचा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. गोकाकमध्ये आपल्या गार्डन निवास या गृहकचेरीत पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, भाजप नेहमीच जातीपातीचे तंत्र स्वीकारते. जातीपातींसाठी प्राधिकरण स्थापण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जनतेसाठी अधिक काम करावे, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे.
भारतात ५ ते ६ हजार विविध जाती आहेत. प्रत्येक जातीसाठी भाजपने असे प्राधिकरण स्थापन करावेत. परंतु
विशिष्ट जातीसाठी प्राधिकरण स्थापना करून इतर जातींवर अन्याय करण्यात येऊ नये, तसेच समाज विरोधी तंत्र अवगत करू नये. जातीपातींच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपचा त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे भाजपच्यावतीने जातीच्या नावावर निवडणुकीची रणनीती खेळण्यात येत आहे. परंतु अशा गोष्टींमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानाचेही त्यांनी खंडन केले. सीमाप्रश्नायाबाबत महाजन अहवालच अंतिम असल्याचे त्यांनी म्हटले. सीमाभागात राहणाऱ्या मराठी आणि कन्नड जनतेमध्ये सौहार्दतेचे वातावरण असून मराठी आणि कानडी जनता सलोख्याने रहात आहे. असे ते म्हणाले. बेळगावमध्ये दुसऱ्यांदा अधिवेशन भरविण्याची तयारी सरकारने केली असून या अधिवेशनाआधी बेळगावचा विकास करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी दिली. बेळगावची अवस्था बिकट झाली असून सध्या सुरु असलेल्या बेळगावच्या विकासकामांवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. हे अधिवेशन बंगळूरपुरतेच मर्यादित ठेवण्याचा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.
देशभरात काँग्रेसच्या पराभवाची चर्चा सुरु आहे. निवडणूक म्हटली कि विजय आणि पराभव हा असणारच. काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत. संपूर्ण राज्यभरात निवडणुकीची तयारी जोरदार करण्यात येत असून येत्या निवडणुकीत नक्कीच आपला विजय होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.