सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलची सायकलिंग मोहीम यशस्वीरित्या संपन्न -सांबरा बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावतर्फे आयोजित सांबरा ते गोडचीनमलकी फाॅल्स आणि परत सांबरा अशी सायकलिंग मोहीम आज सकाळी यशस्वीरित्या उत्साहात पार पडली.
भारतीय हवाई दलाच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलतर्फे आज शनिवारी सकाळी सांबरा ते गोडचीनमलकी फॉल्स आणि परत सांबरा अशा सुमारे 92 कि. मी. अंतराच्या सायकलिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेचे उद्घाटन सकाळी 6 वाजता एअरमन ट्रेनिंग स्कूलचे स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन झचारिया यांनी ध्वज दाखवून केले. सदर सायकलिंग मोहिमेमध्ये ट्रेनिंग स्कूल स्कूलच्या 60 एअरमन्सचा सहभाग होता.
एअरमन्समधील साहस कौशल्य वाढावे आणि त्यांच्या तंदुरुस्तीसाठी तसेच “एक भारत श्रेष्ठ भारत” या शीर्षकाखाली स्थानिक जनतेमध्ये राष्ट्रीय एकात्मता, अनेकतेमध्ये एकता आणि जातीय सलोख्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने या सायकल प्रवास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.