तालुक्यातील विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करत अनेक भागातील नागरिकांनी ग्रामीण आमदारांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विनायक नगर, कंग्राळी बुद्रुक येथे रस्त्याचे कामकाज सुरु करावे, या मागणीसाठी येथील स्थानिकांनी ग्रामीण आमदारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात नुकताच रास्ता रोको करण्यात आला होता. विनायक नगर येथील रस्ते कामांना प्रारंभ करावा अशी मागणी अनेक वर्षे येथील नागरिक करीत आहेत. या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात मोडणाऱ्या या भागात मागील दहा वर्षांपासून कोणतीच विकास कामे राबविण्यात आलेली नाहीत. या भागात रस्त्यासह सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींची व्यवस्था नाही.
यासंदर्भात लोकप्रतिनिंधीनसह ग्रामपंचायतीकडे अनेकवेळा तक्रारी आणि निवेदने सादर करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीने आतापर्यंत ग्रामस्थांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी आपली व्यथा मांडण्याबरोबरच प्रशासनाला जागे करण्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको करण्यात आला होता.
या भागातील विकासासाठी ग्रामीण आमदारांनी काळजीपूर्वक लक्ष् देऊन रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत, यासोबतच इतर समस्यांचेही निवारण करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. या मागणीची पूर्तता लवकरात लवकर न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.