बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित रस्ते सुरक्षा बैठक बुधवारी सकाळी पार पडली. बैठकीत हेल्मेट सक्ती आणि सुरक्षा नियमांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रादेशिक आयुक्त तसेच पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 15 वर्षे जुन्या झालेल्या मॅक्सीकॅब आणि ऑटो रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण, रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती, सुरक्षा नियमांचे पालन, जिल्ह्यातील ब्लॅक स्पाॅट चिन्हांकित करणे, मालवाहू वाहनातून मजुरांच्या होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालणे आदी विषयांवर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी वरिष्ठ रहदारी पोलीस अधिकाऱ्यांनी 15 वर्षे जुन्या झालेल्या मॅक्सी कॅबच्या परवान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा मालकांनी चालक वाहन परवाना 15 वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा असावा अशी मागणी करत असले तरी त्याची पूर्णता अंमलबजावणी होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीचा अहवाल बैठकीत सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने 4 वर्षाच्या मुलापासून सर्वांनाच हेल्मेट सक्तीचा आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या आठवड्यात किती खटले दाखल झाले? काय कारवाई केली आहे? आणि दर आठवड्याला दंडाच्या स्वरूपात किती महसूल जमा होत आहे, याचीही माहिती मगदूम यांनी दिली.
बैठकीत दुचाकीवरील मागच्या स्वराला हेल्मेट अनिवार्य आहे की नाही? यावर देखील चर्चा झाली. जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी उपस्थीत अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीस संबंधित सर्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.