प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्या एका गर्भवती महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून आणि बाळंतिणीचे प्राण वाचविण्यात आल्याची घटना काल रात्री शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये घडली.
संबंधित बाळ आणि बाळंतिणीसाठी डॉ. सतीश चौलीगर आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर हे खऱ्या अर्थाने वास्तविक जीवनातील हिरो ठरले आहेत. विशेष म्हणजे डॉ. चौलीगर यांनी प्रसूतीसाठीची शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत केले आहेत.
या घटनेचा पूर्वार्ध असा की, घोटगाळी (ता.खानापूर) गांवातील मनीषा दीपक कुंभार या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गेल्या गुरुवारी रात्री बेळगांव सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आले होते. परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्यामुळे बिचाऱ्या मनीषावर प्रसूती वेदना सहन करत हॉस्पिटल बाहेर रात्र काढावी लागली होती. फक्त कोरोनाबाधित गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दाखल करून घेतले जाते असे सांगून त्यावेळी मनीषाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला होता.
पहाटे फिरावयास जाणाऱ्या मंडळींनी हा प्रकार त्वरित फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या कानावर घातला, तेंव्हा दरेकर यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेऊन मनीषा कुंभार हिला शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्याची व्यवस्था केली. कुंभार कुटुंबीयांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नवजीवन हॉस्पिटलचे डॉ. सतीश चौलीगर यांनी मदतीचा हात पुढे करून मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
आपले आश्वासन पाळताना डॉ. सतीश चौलीगर यांनी प्रतिकूल परिस्थितीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या गर्भवती मनीषा कुंभार हिच्यावर काल रात्री यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळ आणि बाळंतिणीचे प्राण वाचविले. बाळ जन्माला येताच नवजीवन हॉस्पिटलमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी तत्परता दाखवून एका असहाय्य गरीब कुटुंबाला केलेल्या उपरोक्त मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याचप्रमाणे सध्या एकीकडे खाजगी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या असहाय्य कुटुंबीयांची आर्थिक पिळवणूक केली जात असताना डॉ. सतीश चौलीगर आणि नवजीवन हॉस्पिटलमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी मोफत शस्त्रक्रिया व उपचार करून दाखविलेल्या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.