काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश घेतलेल्या रमेश जारकीहोळी यांनी भाजप पक्षश्रेष्ठी आणि भाजपमधील इतर नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. काँग्रेसमधून भाजपात प्रवेश घेतल्यानंतर भाजपमधील काही नेत्यांनी त्यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती. परंतु या टीका टिप्पण्यांना फोल ठरवत भाजपमध्ये आपले स्थान जारकीहोळी यांनी निश्चित केले आहे.
जलसंपदा मंत्री पदी निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी व्यवस्थितरीत्या हाताळल्या आहेत. कोविड काळातही सामर्थ्य सिद्ध करत सामाजिक स्तरावर परिस्थिती हाताळण्यात ते यशस्वी ठरले आहेत. दोन आठवडेही ते भाजपमध्ये टिकणार नाहीत, पुन्हा काँग्रेसमधील परततील अशा टीकांना त्यांनी आपल्या कार्यातून प्रत्युत्तर दिले आहे. गोकाक येथे झालेल्या एका कार्यक्रमात आरएसएसच्या नेत्यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे. या कार्यक्रमात रमेश जारकीहोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रमेश जारकीहोळी हे कोणत्याही पक्षाचे असुदे परंतु ते ज्या पक्षात असतात तेथे ते निष्ठावान रहातात. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या जारकीहोळींनी अल्पावधीतच भाजपमध्ये सर्वांची मने जिंकली आहेत. बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी बेळगावमध्ये भाजप कार्यालय सुरु करण्याबाबत जारकीहोळींकडे विचार व्यक्त केले होते. यावर तातडीने विचार करून वैयक्तिक एक कोटी रुपये आर्थिक सहाय्य्य करण्याचा भरवसा दिला.
आज गोकाकमध्ये भाजपचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी रमेश जारकीहोळी यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. या कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रसार माध्यमांनीच या अफवा उठविला आहेत. शाळा सुरु करण्याबाबत ते म्हणाले कि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करण्याबाबत सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नसून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी काळजीपूर्वक लवकरच निर्णय घेण्यात येईल.
येत्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक विभागातील मतदारांचा विश्वास मिळवावा, पक्ष संघटनेला महत्व द्यावे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मुस्लिम विरोधी नाहीत. देशाच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी भाजप कार्यरत आहे.