महाराष्ट्र एकीकरण समितीतील अनेक मान्यवर आणि नेते मंडळींनी आधीच राष्ट्रीय पक्षांशी हातमिळवणी केली आहे. आता एकापाठोपाठ एक अनेक मान्यवरांची यादी राष्ट्रीय पक्षाकडे वळली आहे. खानापूरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार अरविंद पाटील यांच्याही भाजप प्रवेशाबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
राज्योत्सव दिनासंदर्भात बोलताना जलसंपदा मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी हे विधान केले असून अद्याप अरविंद पाटील यांच्याकडून भाजपा प्रवेशाबाबद्दल कोणत्याही प्रकारचे विधान व्यक्त झाले नाही. माजी आमदार अरविंद पाटील यांना लवकरच भाजपमध्ये स्थान दिले जाईल, असे विधान जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बेळगाव डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद पाटील यांना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री रमेश जारकीहोळी आणि विधानपरिषदेचे सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी पाठिंबा दर्शविला होता. परंतु हे सहकार्य असून यात कोणतेही राजकारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. परंतु अचानक रमेश जारकीहोळी यांनी काळ्या दिनी केलेल्या विधानानंतर मराठी जनता संभ्रमात पडली आहे. रमेश जारकीहोळी यांनी लवकरच अरविंद पाटील भाजपात प्रवेश करतील असं म्हटलं आहे.
पत्रकारांशी बोलताना ते पुढे जारकीहोळी म्हणाले कि, अरविंद पाटील हे कधीही समितीचे आमदार नव्हते. ते अपक्ष आमदार होते. परंतु ते आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना भाजपमध्ये योग्य स्थान दिले जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान अरविंद पाटील यांच्या भाजप पक्षातील प्रवेशासंदर्भातील बातमी ऐकून मराठी जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण सीमाभागातील मराठी जनता आज केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत असून ६४ वर्षे सातत्याने लढा देणाऱ्या मराठी जनतेच्या भावना या बातमीमुळे दुखावल्या गेल्या आहेत. तर अनेक समिती कार्यकर्त्यांचा द्वेष उफाळून आला आहे. तालुक्यातील मराठी जनतेचे शिलेदार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर निवडून आलेल्या माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशावर उलट सुलट चर्चा सुरु असून पुन्हा एका समिती नेत्याचा मोर्चा राष्टीय पक्षाकडे वळाल्यामुळे स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही चर्चा रंगत आहे.
दरम्यान बेळगाव live अरविंद पाटील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही किंवा त्यांनी रमेश जारकीहोळी यांच्या वक्तव्या बाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही त्यामुळे मराठी जनता अद्याप संभ्रमात आहे.