गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीमुळे आपली शेती व घर-दार गमाविलेल्या रामदुर्ग तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारचा मदत निधी मंजूर केला नसल्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिरी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रसंगी स्वतःला चेअरमन म्हणून घेणाऱ्या यल्लम्मा या वृद्ध शेतकरी महिलेने पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील मंत्री आणि राज्य सरकारचे धिंडवडे काढले. मदतनिधीसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पाय तेवढे धरायचे बाकी असल्याचे तिने खेदाने सांगितले.
आमचे सवदी साहेब इथे आहेत काय? असतील तर त्यांना बोलवा येथून जाण्यापूर्वी आम्ही त्यांचा खरपूस समाचार घेणार आहोत किंवा जारकीहोळी असतील तर त्यांना आम्हा शेतकऱ्यांना विष घालून मारून टाकायला सांगा, असेही यल्लम्मा संतप्तपणे म्हणाली.
आपल्याला मंत्री म्हणून ओळख कोणामुळे मिळाली याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. त्यांना खरंतर आम्हा शेतकऱ्यांचा अभिमान आणि काळजी वाटली पाहिजे. पुरात सर्वस्व वाहून गेल्याने एक दिवस एक आठवडा नव्हे तर गेले 15 महिने झाले आम्ही खडतर जीवन जगत आहोत. मात्र आजतागायत सरकारकडून आम्हाला कोणतीच मदत मिळालेली नाही. आता याबाबतीत जिल्हाधिकारी तरी काय करतात काय बघूया? म्हणून आम्ही बेळगांवला आलो आहोत, असे यल्लम्माने स्पष्ट केले.
पोटतिडकीने रामदुर्ग तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती कथन करताना यल्लम्माने विरोधीपक्षनेते सिद्धरामय्या यांनाही सोडले नाही. त्यांच्यावर देखील तिने टीका केली. सिद्धरामय्या यांनी आमच्या गावाला भेट देऊन मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. ते सध्या आजारी आहेत असे कळाले अन्यथा तुम्ही विरोधी पक्षनेते कशासाठी आहात? असे त्यांना विचारण्याची माझी इच्छा होती असेही वृद्ध यल्लम्मा म्हणाली.