शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील रस्ता रुंदीकरण करण्यात आल्यानंतर पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होती. यासंदर्भात आज सकाळी रहदारी पोलीस विभागाचे सीपीआय हंडा यांना या मार्गावर परिस्थिती दर्शविण्यासाठी बोलाविण्यात आले होते. त्यासोबतच शहर उत्तरचे आमदार अनिल बेनके हेही उपस्थित होते. सकाळची परिस्थिती पाहिल्यानंतर आज सायंकाळी रहदारी पोलीस विभागाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
रामलिंग खिंड गल्ली येथील जत्तीमठ देवस्थानापासून ते टिळकचौकापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी चारचाकी वाहनांची पार्किंग संख्या वाढू लागली होती. त्याचप्रमाणे याठिकाणी न्यूक्लियस मॉल जवळ चित्रपट गृह असल्याने दिवसभरात अनेकवेळा वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीमुळे जवळच कार पार्किंग असल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या चारचाकी वाहनांना अडथळा निर्माण होत होता.
दरम्यान या रस्त्याला पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले होते. वारंवार येथील व्यावसायिक आणि वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले आहेत. या साऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या गल्लीतील नागरिकांनी रहदारी पोलीस विभागाला चार दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. त्यानंतर आज सकाळी रहदारी पोलीस विभागाचे सीपीआय हंडा यांना बोलाविण्यात आले होते.
वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या पाहून यावर नक्की तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आज सायंकाळी झालेल्या बैठकीत या रस्त्यावर ऑड-इव्हन पार्किंगची सोय करण्यात येईल, तसेच संबंधित ठिकाणी फलक लावण्यात येतील, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले आहे. येत्या चार दिवसात रहदारी पोलीस विभाग, महानगरपालिका आणि भाजप राज्य ओबीसी सचिव किरण जाधव यांच्या सहयोगातून या रस्त्यावर फलक बसविण्यात येणार आहेत.
यावेळी आमदार अनिल बेनके, राज्य भाजप ओबीसी सचिव किरण जाधव, रहदारी पोलीस विभागाचे सीपीआय हंडा, संतोष पेडणेकर, कपिल नारळीकर, ईश्वर किल्लेकर, मोहन कारेकर, हेमंत शिंदे, किशोर देसाई आदींसह इतर नागरिक उपस्थित होते.