शहरातील यंदे खूट ते समादेवी गल्ली या मार्गावर एका बाजूस बसणाऱ्या भाजीविक्रेत्या महिलांना भाजी विक्रीस मनाई करून महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून हटवल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे महापालिकेकडून देण्यात आलेली ओळखपत्रे काय कामाची? असा संतप्त सवाल भाजी विक्रेत्या महिलांकडून केला जात आहे.
बेळगांव महानगरपालिकेकडून अलीकडेच शहरात रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्या स्त्री-पुरुषांना अधिकृत परवाने आणि ओळखपत्रे देण्यात आली आहेत. भाजीपाला विक्रीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या रस्त्यावरील गरीब भाजी विक्रेत्यांना कोणाकडूनही त्रास होऊ नये यासाठी संबंधित ओळखपत्रे देण्यात आले आहेत.
तथापि यंदे खुट ते समादेवी गल्ली रस्त्याच्या एका बाजूला नेहमीप्रमाणे भाजीविक्रीस बसलेल्या महिलांना आज महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी रस्त्यावर भाजी विक्री करण्यास मज्जाव करून त्यांना तिथून हटविले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्या महिलांनी युनियन बँकेसमोर ठिय्या आंदोलन करून आपला निषेध नोंदविला. त्याच प्रमाणे आपल्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात संबंधित भाजीविक्रेत्या महिला आज जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत.
लॉक डाऊनमुळे चार महिने भाजी विक्रीचा धंदा झालेला नाही. यामुळे आधीच आमची घरची परिस्थिती बिकट झालेली आहे. लॉक डाऊननंतर आता म्हणावा तसा व्यापार देखील नाही. महापालिकेने ओळखपत्रे दिल्यानंतर आमचा भाजीपाल्याचा धंदा सुकर होईल असे वाटत होते.
परंतु आता खुद्द महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांकडून आम्हाला त्रास दिला जात आहे. समादेवी गल्लीत बसण्याऐवजी वनिता विद्यालय रस्त्यावर बसून भाजी विक्री करा, असे आम्हाला सांगितले जात आहे. परंतु त्या ठिकाणी भाजी घ्यायला कोण येणार? असा सवाल करून आम्ही सर्व भाजीविक्रेते आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला जाणार आहोत, असे एका भाजीविक्रेत्या महिलेने बेळगांव लाईव्हशी बोलताना सांगितले.