शहापूर पोलिस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी एका वकीलाला विनाकारण मारहाण केल्याचा आरोप करत बेळगांव बार असोसिएशनतर्फे आज गुरुवारी आंदोलन छेडून रास्ता रोको करण्यात आला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहापूर येथील शितल रामशेट्टी हे वकील काल रात्री आपल्या घरासमोरील रस्त्यावर मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या पोलिसांनी कोणतीही विचारपुस न करता ॲड. रामशेट्टी आणि त्यांच्या मित्रांना मारझोड करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी रामशेट्टी यांनी आपण वकील असल्याचे सांगून मारझोड करण्याचे कारण विचारले. तेंव्हा त्या पोलिसांनी अर्वाच्य शिवीगाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत आपल्या वाहनासह घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
पोलिसांच्या या दंडेलशाहीचा तसेच एका वकीलाला विनाकारण मारहाणीच्या घटनेचा बेळगांव बार असोसिएशनने निषेध केला असून यासंदर्भात आज गुरुवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी न्यायालय आवारासमोरील मार्गावर कांही काळ रास्तारोको देखील करण्यात आला. त्याचप्रमाणे ॲड. शितल रामशेट्टी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, एका कायदे तज्ज्ञाला जर पोलिस अशा प्रकारे वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल शहापूर परिसरात केला जात आहे.