एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी हॉस्टेलमधील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. मुत्यानट्टी येथील परिसरात असलेल्या पवनचक्की नजीक आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवरून फिरण्यासाठी गेलेल्या या युवतीवर मोटारसायकलवरून आलेल्या काही जणांनी अडवणूक करून लैंगिक अत्याचार केला. अश्लील भाषेत शिवीगाळ करून यावेळी या घडल्या प्रकारचे मोबाईलवरून शुटिंगही घेण्यात आले.
शिवाय या युवतीसोबत असलेल्या तिच्या मित्राला मारहाणही करण्यात आली. त्यांच्याकडील मोबाईल आणि काही रोख रक्कम काढून घेण्यात आली. घडल्या प्रकाराची वाच्यता कुणाकडेही केल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली. घाबरलेल्या या युवतीने आणि मित्राने तेथून सहीसलामत पळ काढला. आणि थेट हायवे गाठून खाजगी वाहनातून तपास अधिकारी रमेश गोकाक यांच्याकडे धाव घेतली. घडला प्रकार सांगितल्यानंतर याचा तपास घेत चौकशी करून जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक ३ आणि पोक्सो न्यायालयात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती.
न्यायाधीश मंजाप्पा हनुमंतप्पा अन्नयनवर यांनी या प्रकरणी साक्षी पुराव्यांचा जबाब घेऊन या प्रकरणातील पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणातील संजू सिद्दप्पा दड्डी (वय २४, रा. मुत्यानट्टी) सुरेश भरमाप्पा बेळगावी (वय २४, रा. मुत्यानट्टी), सुनील लगमाप्पा दुमगोळ (वय २१, रा. मुत्यानट्टी), महेश बाळाप्पा शिवनगोळ (वय २३, रा. मणगुत्ती), आणि सोमशेखर दुरदुन्डेश्वर शहापूर (वय २३, रा. बैलहोंगल) अशी आरोपींची नावे आहेत. यासंबंधी सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.