पेन्शनधारकांना वर्षातून एकदा सादर करावे लागणारे हयात प्रमाणपत्र आता इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून घरपोच मिळण्याची व्यवस्था पोस्ट विभागाने केली आहे. यामुळे वयोवृद्ध पेन्शन धारक आणि ग्रामीण भागातील लाभार्थींची चांगली सोय होणार असल्यामुळे त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.
पेन्शनधारकांना वर्षातून एकदा हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे हयात प्रमाणपत्र सादर केले जाते. बँक किंवा पोस्ट कार्यालयात हे हयात प्रमाणपत्र देण्यात येते.
परंतु वयोवृद्ध पेन्शनधारकांना आता घरीच राहून हयात प्रमाणपत्र मिळणार आहे. पोस्ट विभागातर्फे “डिजिटल लाइफ सर्टिफिकेट” दिले जाणार असल्याची माहिती पोस्ट विभागाने दिली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून पोस्ट विभाग घरोघरी जाऊन आर्थिक व्यवहार करीत आहे. ग्रामीण भाग तसेच वयोवृद्धांसाठी ही सुविधा उपयोगी ठरणार आहेत.
पोस्टमन तसेच ग्रामीण डाक सेवक पेन्शन धारकांच्या घरी जाऊन त्यांना सेवा देणार आहेत. त्यामुळे हयात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आता बँकांमध्ये गर्दी करण्याची गरज राहणार नाही. बेळगांव विभागात शहरी तसेच ग्रामीण भागात ही सेवा दिली जाणार आहे.
पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधून हयात प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पेन्शन धारकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्ट विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.