गांवच्या पंचक्रोशीसह परगांवच्या बैलगाडी शर्यती जिंकून दबदबा निर्माण करणाऱ्या बसवन कुडची येथील शिवाजी तुकाराम सावकार यांच्या मालकीच्या सर्वांच्या लाडक्या “सिद्ध्या” या शर्यतीच्या बैलाच्या निधनामुळे बसवन कुडची गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बसवन कुडची (ता. बेळगांव) येथील बैलगाडी शर्यतप्रेमी शेतकरी शिवाजी तुकाराम सावकार यांच्या मालकीच्या “सिद्ध्या” या शर्यतीच्या बैलाचे काल सोमवारी रात्री आजारामुळे निधन झाले. सिद्ध्या हा बैल गेली 5 वर्ष सातत्याने बसवन कुडची पंचक्रोशीसह परगांवातील बैलगाड्यांच्या शर्यती गाजवत होता.
कोणत्याही ठिकाणी बैलगाडी शर्यत असो त्यामध्ये सिद्ध्याचा क्रमांक पहिला किंवा दुसरा असणार हे ठरलेले असायचे. बैलगाडी शर्यतीचे प्रत्येक मैदान गाजविणारा सिद्ध्या हा जणू शिवाजी सावकार यांच्यासह समस्त बैलगाडी शर्यत शौकिनांच्या गळ्यातील ताईत होता. पोटच्या मुलाप्रमाणे असणाऱ्या सिद्ध्याच्या निधनामुळे सावकार कुटुंबीय शोकमग्न झाले आहेत.
सिद्ध्या हा गांवातील सर्वांचाच लाडका असल्यामुळे आज मंगळवारी सकाळी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून त्याची गावात अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर दुपारी शिवाजी सावकार यांच्या शेत जमिनीत सिद्ध्याचा दफनविधी पार पडला.
बैलगाडी शर्यतींचा शौक असणाऱ्या शिवाजी तुकाराम सावकार यांच्याकडे लक्ष्या, सोन्या, पोप्या व धाकटा सिद्ध्या असे आणखी चार शर्यतीचे बैल असून मोठ्या सिद्ध्याप्रमाणे या सर्व बैलांची शिवाजी सावकार पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतात.