Sunday, January 5, 2025

/

विद्यार्थ्यांना पुन्हा शेतीकडे वळविणे ही काळाची गरज : तेजस्वी नाईक

 belgaum

शेतीमध्ये सन्मान जनक करिअर करता येते. शेतीपासून दूर जाणार्‍या आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुन्हा शेतीकडे वळविणे ही काळाची गरज असून सेंद्रिय शेती हा अनेक समस्यांवरील रामबाण उपाय आहे, असे मत सेंद्रिय शेती तज्ञ तेजस्वी नाईक यांनी व्यक्त केले.

साउथ कोंकण एज्युकेशन सोसायटी संचलित आरपीडी महाविद्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी सेंद्रिय शेती संदर्भातील नव्या अभ्यासक्रमाचा अर्थात कोर्सचा उद्घाटन समारंभ पार पडला. याप्रसंगी नाईक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीडी महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष बिंबा नाडकर्णी या होत्या.

आरपीडी महाविद्यालय रेड क्रॉस विभाग आणि इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती संदर्भातील कोर्स आजपासून सुरू करण्यात आला आहे. सलग सहा आठवडे चालणारा हा कोर्स ऑनलाईन असून एकूण 30 विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत दोन दिवस प्रात्यक्षिके सादर केली जातील असेही तेजस्वी नाईक यांनी स्पष्ट केले.Rpd college

आपल्या अध्यक्षीय भाषणात बिंबा नाडकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणारे उपक्रम राबविण्यात आरपीडी महाविद्यालय नेहमीच आघाडीवर असल्याचे सांगून शेतीकडे आधुनिक दृष्टिकोनातून बघण्यासाठी हा कोर्स उपयुक्त ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. इनरव्हील क्लब बेळगांवच्या सचिव मांजरी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अचला देसाई यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालण्याद्वारे सेंद्रिय शेती संदर्भातील कोर्सचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमास महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या सदस्य लता कित्तूर, आशा नाईक, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, युथ रेडक्रॉस कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आय. किट्टाळी आदींसह महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि निमंत्रित हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी अमिना शेख हिने केले, तर दक्षता हिने सर्वांचे आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.