लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून तालुक्याच्या पूर्व भागासह संपूर्ण ग्रामीण भागात भाजपने ऑपरेशन कमळ राबविण्यास सुरुवात केली आहे.
पक्ष बळकटीच्या दृष्टीने आता या पक्षातून त्या पक्षात अनेक नेते मंडळी उड्या मारायच्या तयारीत असून सांबरा येथील जिल्हा पंचायत सदस्यांने नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश मिळविला आहे. यामुळे भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’ ची चर्चा जोरदार रंगात येऊ लागली आहे.
काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी गटातील सांबरा भागातील जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा अनिगोळकर यांनी आज काँग्रेसला राजीनामा दिला आहे. बेळगाव ग्रामीण विभागातील अनेक नेत्यांसमवेत कार्यकर्त्यांनी काँग्रेसला राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेण्याची तयारी पूर्व भागातील काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी केली असून त्यांना भाजपच्या रमेश जारकीहोळी यांचा पाठिंबा असल्याचे मत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
बेळगावमधील प्रसारमाध्यमाशी चर्चा करताना आपण लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मत कृष्णा अनिगोळकर यांनी व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांसह आपण भाजप प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डीसीसी बँक निवडणुकीत संचालकपदी निवडून आलेल्या काँग्रेस समर्थकांनी भाजपाकडे अचानकपणे आपला मोर्चा वळविला असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून जोरदार रणनीती आखण्यास आणि ती राबविण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सांबरा येथील कृष्णा अनिगोळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीमुळे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना धक्का पोहोचला असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
बेळगावमधील लोकसभा निवडणूक काँग्रेसच्यावतीने सतीश जारकीहोळी तर भाजपच्या वतीने रमेश जारकीहोळी यांच्या उमेद्वारांच्यात जोरदार लढत देणारी ठरणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ऑपरेशन कमळ चा श्रीगणेसह झाल्याचे चित्र दिसत आहे.