बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मागण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा गळा दाबून बाहेर हाकलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या ३१ वर्षांपासून आपल्या जमिनीसंबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या वृद्ध शेतकऱ्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याने आपल्यासोबत हा प्रकार केल्याचा आरोप बसनगौड भरमगौडर या शेतकऱ्याने केला आहे.
कित्तूर तालुक्यातील मरकट्टी या गावातील बसनगौड भरमगौडर हा शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या जमिनीसंबंधी चौकशी करण्यासाठी आला होता. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याशी वाद झाला. यावेळी या कर्मचाऱ्याने या वृद्ध शेतकऱ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करून कार्यालयातून बाहेर हाकलून देण्यात आले असा आरोप करण्यात आला आहे.
या शेतकऱ्याने सांगितले कि, कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी राष्ट्रीय महामार्गाजवळ त्यांची १८ एकर जमीन आहे. या जमिनीवर सरकारी अधिकाऱ्यांनी कब्जा करून पीडब्ल्यूडी म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात हायकोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले असून या जमिनीवर जमीन मालकाचे नाव समाविष्ट करण्यात यावे, यासाठी न्यायालयाने पाचवेळा निर्देश दिले आहेत. परंतु या प्रकरणी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. हि जमीन सुपीक असून येथील पिके नष्ट होत आहेत. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या जमिनीवर मालकाचे नाव समाविष्ट करून सर्व्हे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परंतु कोणताही सर्व्हे न करता अधिकाऱ्यांनी या जमिनीचा समावेश सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारीत करील आहे. याव्यतिरिक्त ३ एकर जमीन आधीच महामार्गासाठी घेण्यात आली असून यापैकी केवळ २१ गुंठ्याची भरपाई देण्यात आली आहे. यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नसून मागील ३१ वर्षांपासून यासंदर्भात चौकशीसाठी प्रयत्न करत असून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही. आज पुन्हा याची चौकशी करण्यास गेले असता माझ्यासोबत हा प्रकार घडला असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले.