स्मार्ट सिटीची कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याबरोबरच येत्या चार दिवसात वॉर्डनिहाय पाहणी करून बेळगांव उत्तर मतदारसंघ म्हणजेच बेळगांव शहर खड्डेमुक्त करण्याचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
एकीकडे सोशल मीडियावर शहरातील स्मार्ट सिटीची कामे व्यवस्थित होत नसल्याचा आरोप केला जात असताना शुक्रवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी कोर्ट आवारासमोरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची पाहणी करून कामाचा दर्जा तपासला. याप्रसंगी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, सध्या सोशल मीडियावर स्मार्ट सिटीचे काम चांगले होत नसल्याची चर्चा आहे. त्याची गंभीर दखल घेऊन सध्या कॉलेज रोडपासून कोर्ट आवारमार्गे आरटीओ सर्कलपर्यंतच्या रस्त्याचा दर्जा मी तपासला आहे. हा रस्ता दर्जेदार व्हावा आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी सक्त सूचना मी कंत्राटदाराला दिली आहे.
या मार्गावर सध्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही लोकांच्या तक्रारी आहेत. तथापी कोर्टमार्गे आरटीओ सर्कलपर्यंतचा रस्ता इतका सुंदर होणार आहे की पुढील 30 वर्षे या रस्त्यासंदर्भात तक्रार निर्माण होणार नाही. काम दर्जेदार व्हावयाचे असेल तर त्याला थोडा वेळ लागतो यासाठी माझी समस्त जनतेला विनंती आहे की अशावेळी निर्माण होणारी असुविधा लक्षात घेऊन जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगून स्मार्ट सिटीच्या कामाच्या बाबतीत एखादी गंभीर समस्या असेल तर सोशल मीडियावर त्याची वाच्यता करावी मी स्वतः त्याची दखल घेऊन या समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न करेन, असे आमदार बेनके यांनी स्पष्ट केले.
बेळगांव उत्तर मतदारसंघ अर्थात बेळगाव शहर खड्डा मुक्त झाले पाहिजे या दृष्टिकोनातून गेल्या 4 -5 दिवसाच्या चर्चेअंती मी स्वतः वॉर्डनिहाय पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू करण्याचा आदेश देणार आहे. मात्र तत्पूर्वी सोशल मीडियावर नागरिकांनी आपापल्या भागातील खड्ड्यांचे फोटो आणि स्वतःचा मोबाईल नंबर द्यावा. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्या रस्त्यावर खड्डे आहेत याचा अहवाल देण्यास सांगितले आहे. अधिकार्यांचा अहवाल आणि जनतेने दिलेली माहिती याच्या आधारे मी स्वतः जातीने प्रत्येक वॉर्डात पाहणी करून इंजिनीअर आणि कंत्राटदाराच्या मदतीने रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर करणार आहे. येत्या चार दिवसात म्हणजे सोमवार किंवा मंगळवारपासून मी हा उपक्रम हाती घेणार आहे, अशी माहितीही ही आमदार बेनके यांनी दिली.
स्मार्ट सिटीच्या विकास कामांबाबत बोलताना ते म्हणाले की, अन्य क्षेत्राची मला कल्पना नाही मात्र बेळगांव उत्तर मतदारसंघांमध्ये मात्र स्मार्ट सिटीची विकास कामे दर्जेदार व्हावीत यासाठी मी पहिल्यापासूनच प्रयत्नशील आहे आणि त्याबाबतीत मी बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झालो आहे. बेळगांव उत्तर मतदार संघातील एपीएमसी येथील रस्त्यासारखे कांही अपवाद वगळता सर्व विकास कामे दर्जेदार झाली आहेत.
बेळगांव भकास होत आहे, हा आरोप शहराच्या उत्तर भागात लागू होत नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगून आपल्या मतदार संघात म्हणावी तशी कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे बेनके यांनी सांगितले. शहरातील रस्ते खड्डे विरहीत सुस्थितीत व्हावे आणि नाला सफाई या दोन महत्त्वाच्या कामांना मी प्राधान्य दिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जवळपास तीन महिने आधीच मी कोनवाळ गल्ली नाला, गांधीनगर नाला, लेंडी नाला, बळ्ळारी नाला आदी नाल्यांची सफाईची मोहीम राबवली होती. त्याचे फलित म्हणजे यंदा गांधीनगर, शिवाजीनगर आदी भागातील घराघरांमध्ये पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाले नाही, हे देखील आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शेवटी स्पष्ट केले.
खड्ड्यांचे फोटो व्हाट्स अप करा खड्डे मुक्त उत्तर बेळगाव बनवा-या या क्रमांकावर खड्डे व माहिती पाठवा +919916831594
+918867575209
#nopathholesbelgaum
#nourthbelgaum
#mlabenake
#livebelgaum