कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी सध्यातरी कोरोना चांचणीची गरज नाही. मात्र दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्याच्या प्रवाशांना मात्र महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यापूर्वी आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.
रेल्वे मार्गे महाराष्ट्रात जाणाऱ्या उपरोक्त राज्यातील प्रवाशांना देखील हाच नियम लागू असणार असून त्यांनादेखील आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. दरम्यान रस्तेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर शरीराच्या तापमानासह कोविड संदर्भातील चांचणी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला आहे.
या चार राज्यातून विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी स्वतःसोबत आपला आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बाळगणे आवश्यक आहे. विमानात चढण्यापूर्वी आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर विमानतळाबाहेर पडण्यापूर्वी हा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तपासला जाईल.
महाराष्ट्रातील विमानतळावर पोहोचलेल्या वेळेच्या आधी 72 तासाच्या आत प्रवाशाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट मिळालेला असला पाहिजे. ज्यांच्याकडे टेस्ट रिपोर्ट नसेल त्यांची संबंधित विमानतळावर सक्तीने आरटी-पीसीआर चांचणी करून मगच त्यांना घरी जाऊ दिले जाणार आहे.
या चांचणीचा खर्च प्रवाशाला द्यावा लागणार आहे. एखाद्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याला नियमानुसार वागविले जाईल. उपरोक्त चार राज्यातील रेल्वे प्रवाशांच्या बाबतीत देखील वरीलप्रमाणे प्रक्रिया राबविली जाईल.