शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने महाराष्ट्रासह अनेक स्तरावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील तमाम शिवसैनिकांसह अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली देताना सीमाभागाचा उल्लेख करून सीमाप्रश्न सोडवणुकीचा निर्धार व्यक्त केला आहे.
संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगून शिवसेनेने अनेक हुतात्मे दिले आहेत. अनेक लढ्यांमध्ये शिवसेना अग्रभागी आहे. भाषिक प्रांतरचनेननंतर बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात अन्यायाने डांबला गेला. याविरोधात शिवसेनेने अनेकवेळा आवाज उठवून आंदोलने, लढे दिले आहेत. गेली ६४ वर्षे अन्याय, अत्याचारही झुंज देत सीमाभागातील मराठी जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
नुकत्याच झालेल्या काळ्यादिनी सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात आले. १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनी कर्नाटक सरकार अनेक पद्धतीचे रोख लावून मराठी जनतेला दुजाभावाची वागणूक देते. हा सीमालढा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या समोर यावा, यासाठी १ नोव्हेंबर २०२० रोजी मंत्रालयासह मुंबईतील अनेक ठिकाणी काळा दिन पाळण्यात आला. आणि केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
गेली ६४ वर्षे सातत्याने न्यायासाठी लढा देणाऱ्या मराठी जनतेला महाराष्ट्रातील शिवसेना सरकारमुळे दिलासा मिळत आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कसोशीने प्रयत्न करत असून सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आलेल्या खटल्यासाठी आपली बाजू भक्कम करण्यासाठी जोरदार तयारीही करत आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अखंड महाराष्ट्राचे स्वप्न नक्कीच साकार होईल, या आशेपोटी सीमाभागातील मराठी जनता आस लावून आहे.
आज त्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहताना बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारची बाजू भक्कमपणे मांडून न्यायासाठी धडपडणाऱ्या सीमाभागातील मराठी जनतेचा विजय नक्कीच होईल, अशी आशा प्रत्येक मराठी माणसाला आहे.