टिळकवाडी येथील साउथ कोंकण एज्युकेशन सोसायटी (एसकेई) संचलित राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाचा एनसीसी छात्र एसयुओ प्रथमेश पाटील याला 2019 -20 सालातील “संरक्षण राज्यमंत्री प्रशस्तीपत्रक” जाहीर झाले आहे. याबद्दल संस्थेच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
एनसीसी छात्र एसयुओ प्रथमेश पाटील याच्या उल्लेखनीय यशाबद्दल एसकेई सोसायटीच्यावतीने खजिनदार बी. एस. कलघटगी यांनी त्याचा विशेष सत्कार केला. याप्रसंगी एनसीसी ऑफिसर लेफ्ट. डॉ. एस. एस. कुरणी उपस्थित होते. प्रथमेश पाटील याच्या या यशामुळे राणी पार्वतीदेवी महाविद्यालय आणि 26 कर्नाटक बटालियनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे प्रशंसोद्गार कलघटगी यांनी काढले.
प्रथमेश पाटील याचा प्रामाणिकपणा, शिस्त आणि एनसीसीतील योगदान हे सारेच अनुकरणीय असल्यामुळे त्याला संरक्षण राज्यमंत्री प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एनसीसीमधील विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सुमारे 26 हून अधिक शिबिरांमध्ये प्रथमेश पाटील यांचा विशेष सहभाग होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2019 मध्ये त्याला एनसीसी महासंचालनालयाच्या प्रशस्तीपत्रकाने गौरविण्यात आले होते. अश्या पद्धतीने सन्मान मिळविणारा प्रथमेश हा 26 कर्नाटक बटालियन चा पहिलाच छात्रसैनिक आहे. 26 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव खजुरिया, एओ कर्नल आदित्य वर्मा, सुभेदार मेजर सी. व्ही. पाटील, महादेव जगताप आरपीडीचे एनसीसी एएनओ लेफ्ट. डाॅ. एस. एस. कुरणी यांचे प्रथमेश पाटील यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक आणि आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अचला देसाई यांनी प्रथमेश पाटील याचे विशेष कौतुक केले आहे.