मुत्यानट्टी परिसरात आपल्या मित्रासमवेत फिरावयास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी बलात्कार करून लैंगिक अत्याचार केला होता. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात तीन वर्षांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पॉक्सो कायद्यांतर्गत या प्रकरणातील पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील पाचही आरोपींना न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबतीतील आदेश आज न्यायालयाने जारी केले असून न्यायाधीश मंजाप्पा अन्नय्या यांनी या प्रकरणावर सुनावणी केली आहे.
१५ फेब्रुवारी २०१७ रोजी बेळगावमधील हॉस्टेलमधील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. मुत्यानट्टी येथील परिसरात असलेल्या पवनचक्की नजीक आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवरून फिरण्यासाठी गेलेल्या या युवतीवर मोटारसायकलवरून आलेल्या काही जणांनी अडवणूक करून लैंगिक अत्याचार केला. अश्लील भाषेत शिवीगाळ तसेच घडल्या प्रकारचे मोबाईलवरून शुटिंगही घेण्यात आले. शिवाय या युवतीसोबत असलेल्या तिच्या मित्राला मारहाणही करण्यात आली.
यावेळी अत्याचारग्रस्त युवती आणि तिच्या मित्राकडून मोबाईल संच आणि काही रोख रक्कम काढून घेण्यात आली. घडल्या प्रकाराची वाच्यता कुणाकडेही केल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली या आरोपींनी दिली होती. घाबरलेल्या या युवतीने आणि मित्राने तेथून सहीसलामत पळ काढला. आणि थेट हायवे गाठून खाजगी वाहनातून तपास अधिकारी रमेश गोकाक यांच्याकडे धाव घेतली. घडला प्रकार सांगितल्यानंतर याचा तपास घेत चौकशी करून जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक ३ आणि पोक्सो न्यायालयात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायाधीश मंजाप्पा हनुमंतप्पा अन्नयनवर यांनी या प्रकरणी साक्षी पुराव्यांचा जबाब घेऊन या प्रकरणातील पाच आरोपींवर गुरुवार दि. १२ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
यापाठोपाठ न्यायालयाने साक्षी पुराव्यांचा जबाब नोंदवत आज संजू सिद्दप्पा दड्डी (वय २४, रा. मुत्यानट्टी) सुरेश भरमाप्पा बेळगावी (वय २४, रा. मुत्यानट्टी), सुनील लगमाप्पा दुमगोळ (वय २१, रा. मुत्यानट्टी), महेश बाळाप्पा शिवनगोळ (वय २३, रा. मणगुत्ती), आणि सोमशेखर दुरदुन्डेश्वर शहापूर (वय २३, रा. बैलहोंगल) या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.