महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राबाबत केलेल्या विधानाचा कर्नाटकातील नेत्यांसह कन्नड संघटनांनी निषेध व्यक्त केला असून कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान यांनीही अजित पवारांच्या विधानावर तोंडसुख घेतले आहे. महाराष्ट्रातील नेते तोंडाला येईल ते बोलतात, हे कर्नाटकासाठी नवे नाही, अशापद्धतीची टिप्पणी करत महाराष्ट्रातील नेत्यांवर पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान यांनी तोंडसुख घेतले आहे. बेळगावमधील पशुसंवर्धन विभागाला त्यांनी आज भेट दिली यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील नेते हे नेहमीच अशी विधाने करत असतात. आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेली कित्येक वर्षे अशी विधाने महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्यांनी केली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत, राज ठाकरे असोत, किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असोत. महाराष्ट्रातील प्रत्येक नेते सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याची स्पप्ने पहात आली आहेत. आणि याचप्रमाणे सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी वेळोवेळी अनेक वक्तव्ये करण्यात आली आहेत. परंतु कर्नाटकातील कोणताही भाग कुठेही जोडला जाणार नाही, कर्नाटक जसे आहे तसेच राहील, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे.
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून याविरोधात कन्नड संघटनांनी आणि इतर राष्ट्रीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. यासंबंधी बोलताना प्रभू चौहान म्हणाले, कि कर्नाटकात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्यावतीने अनेक दिवसांपासून हि मागणी करण्यात येत होती. राज्यातील नागरिकांचे हित लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी हि घोषणा केली आहे. आणि हे गरजेचेही आहे, असे ते म्हणाले. मराठा विकास प्राधिकरणाप्रमाणेच वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणाचीही घोषणा करण्यात आली आहे. जनतेचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला जागून ती आश्वासने पूर्ण करून दाखविली असल्याचे ते म्हणाले.