अनगोळ येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक ६ मध्ये समाजकंटकांनी मोडतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शिक्षकांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शाळेत सातत्याने हा प्रकार घडत असल्यामुळे पालकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात अनेक ठिकाणी खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नसल्याने अनेकजण शाळेच्या मैदानावर क्रिकेट आणि अन्य खेळ खेळत असतात. सरकारी मराठी शाळा क्रमांक ६ च्या मैदानात अधिक जागा उपलब्ध आहे. यामुळे या शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते. परंतु या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या काहीजणांकडून शाळेतील वस्तूंची सातत्याने मोडतोड करण्यात येत आहे.
बुधवारी काही जणांनी शाळेच्या आवारात घुसून शौचालयाच्या दरवाजासह खिडकी व इतर साहित्याची मोडतोड केली आहे. गुरुवारी सकाळी शाळेत शिक्षक दाखल झाल्यानंतर मोडतोड झाल्याचे निदर्शनास येताच शिक्षकांना धक्का बसला. ही मोडतोड मोठ्या प्रमाणात केली असल्याचे निदर्शनास येताच शिक्षकांनी याबाबत टिळकवाडी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तींविरोधात तकार दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे अनेक शाळा बंद आहेत. यादरम्यान शाळेच्या मैदानावर खेळ खेळण्यासहीत अनेक अनुचित प्रकारही घडत आहेत. याठिकाणी कोणीही फिरकत नसल्यामुळे मद्यपींचा वावरही वाढला आहे.
यादरम्यान शाळेच्या गेट वरून उडी मारून आतील भागात हे प्रकार सुरु आहेत. शिवाय शाळेतील वस्तूंचीही मोडतोड सातत्याने करण्यात येत असून शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.