पैशाशिवाय काही होत नसले तरीही पैशाचा शिक्षणाची संबंध नाही पैसा नसलेली अनेक मुले आज जगाच्या पाठीवर उच्च स्थानावर आरुढ झाली आहेत. सीमाभागातील मराठी माध्यमातून शिकणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्यासाठी एक फंड उभा करण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मराठी विभागाचे डॉ. विनोद गायकवाड यांनी बोलताना केले
येथील मराठा मंदिर या संस्थेच्या वतीने बेळगाव शहर आणि तालुक्यातील दहावी परीक्षेत 90 टक्के हुन अधिक गुण मिळवलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम मंगळवारी मराठा मंदिरच्या अर्जुनराव घोरपडे सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून डॉ. विनोद गायकवाड बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंदिर चे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव हे होते.
अर्ज केलेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक आलेल्या कु. मयुरी यशवंत शहापूरकर (98.72%,मराठी विध्यानिकेतन,राज्यात दूसरी) हिला दहा हजार रुपयाचा, कुमारी श्रुती सुनील बायानाचे (95.72%,गोमटेश हायस्कूल) हिला पाच हजार रुपयाचा आणि कु.श्रेया भरमाना पाटील(95.36,बालिका आदर्श विद्यामंदिर) हिला तीन हजार रुपयाचा पुरस्कार डॉ.विनोद गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला .बाकीच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना दोन हजार रुपये रोख देण्यात आले.
दीप प्रज्वलन, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मराठा मंदिर चे चिटणीस बाळासाहेब काकतकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आप्पासाहेब गुरव यांनी पाहुण्यांचा सन्मान केला.
आपल्या विनोदी आणि मार्मिक भाषणात डॉ गायकवाड यांनी मराठा मंदिर च्या कार्याचे कौतुक केले.” सत्कार करणे हे सत्कार्याचे काम आहे आणि हा तुमच्या टॅलेंटचा गौरव आहे. गुण बकासुरासारखे मिळवा काम भीमासारखे करा असे सांगून गायकवाड यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पी डी पाटील, बाबासाहेब आंबेडकर, भारताचे पहिले अर्थमंत्री सीडी देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना जिद्द ,आत्मविश्वास आणि हिंमतीचे महत्व पटवून दिले .”शिक्षण हे आईच्या पोटात गर्भाचा अंकुर होतो तेव्हा सुरु होते त्यामुळे आईचे सर्व संस्कार हे मुलावर होतात आणि म्हणूनच मातृभाषेतून शिक्षण देणे अतिशय महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.
“जगातले सहा-सात देश वगळता जपान -चीन सारखी प्रगत राष्ट्र सुद्धा केवळ मातृभाषेतून शिक्षण देतात असे त्यांनी सांगितले .विद्यार्थी घडवण्यासाठी त्यागी शिक्षकांची गरज आहे असेही ते म्हणाले
याप्रसंगी उपस्थित असलेल्या मराठा मंदिराचे संचालक नेमिनाथ कंगराळकर, नेताजी जाधव, नागेश झंगरुचे, विश्वासराव घोरपडे, लक्ष्मणराव सैनुचे,चंद्रकांत गुंटकल, शिवाजीराव हंगिरकर ,नागेश तरळे आदींच्या हस्ते उपस्थित विद्यार्थी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले .याप्रसंगी अनेक संचालकांची भाषणे झाली .मराठा मंदिराच्या उपक्रमांची माहिती आप्पासाहेब गुरव यांनी दिली विद्यार्थ्यांनी मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करण्याची गरज त्यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केली सामाजिक अंतर पाळून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अनेक विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक वर्ग उपस्थित होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाटील यांनी केले