मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेला अवघ्या काही तासांचा अवधी लोटला असून या प्राधिकरणाला कन्नड संघटनांनी विरोध दर्शविला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मराठा समाज विकास प्राधिकरण स्थापन करून हा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयाला कन्नड संघटना विरोध करीत आहेत.
मराठा म्हणून विरोध की मराठा जातीला आणि जातीच्या विकासाला विरोध हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
कर्नाटकातील कन्नड संघटनांनी या निर्णयाला विरोध करून मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचा निषेध केला आहे. कर्नाटक सरकारने हा निर्णय घेऊन कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
मात्र कर्नाटकात सीमाभाग वगळता इतर ठिकाणीही मराठा समाज बांधव मोठया प्रमाणात आहेत. परंतु त्यांची बोलीभाषा मराठीच असेल असे सांगता येत नाही, दरम्यान कन्नड संघटनांनी मराठा याचा अर्थ मराठी असा घेऊन विरोध केल्याचे दिसून येत आहे. मराठीला सातत्याने विरोध दर्शविणाऱ्या कन्नड संघटनांनी मराठा प्राधिकरणालाही विरोध दर्शवून मराठीबाबत असणारा पोटशूळ पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.
परंतु मराठा समाजात प्रत्येक माणूस हा मराठी बोलीभाषेचाच असेल, असे नाही. संपूर्ण कर्नाटकात मराठा समाजातील त्या-त्या ठिकाणानुसार अनेक बोलीभाषेचे लोक आहेत, याचे भान या कन्नड संघटनांना नाही.
राज्यातील मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक मदतीसाठी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्या प्राधिकरणाला 50 कोटी रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. ही बाब कन्नड संघटनांना खटकत आहे. कर्नाटक राज्यात मराठा समाज असला तरी त्याची संख्या बेळगाव जिल्ह्यात अधिक आहे.यामुळे दिवंगत भाजप नेते आणि खासदार सुरेश अंगडी यांच्यासह अनेक नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले होते.
याची दखल घेऊन कर्नाटक सरकारने प्राधिकरणाची स्थापना केली असून त्या माध्यमातून विकास साधला जाणार आहे. ‘एक मराठा लाख मराठा’च्या माध्यमातूनही कर्नाटकात झालेल्या मोर्चांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया मराठा समाजात आहे. दरम्यान कन्नड संघटनांनी केलेल्या विरोधाचा निषेध व्यक्त होत आहे.