मण्णूर (ता. बेळगांव) येथील दिग्विजय युथ क्लबतर्फे आयोजित मण्णूर प्रीमियर लीग अर्थात “एमपीएल -2020 सीझन टू” क्रिकेट स्पर्धेला आज रविवारपासून शानदार प्रारंभ झाला. मण्णूर मर्यादित या स्पर्धेत 10 संघांचा सहभाग आहे.
मण्णूर (ता बेळगांव) गावानजीकच्या मैदानावर सदर एमपीएल -2020 सीझन टू क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभपूर्वी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून क्रीडा ज्योतीची दौड काढण्यात आली.
निमंत्रित पाहुणे महाराष्ट्रातील प्रो कबड्डी लीगमधील यु मुंबईचे कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या या दौडमध्ये दिग्विजय युथ क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि क्रिकेटपटू सहभागी झाले होते.
मैदानावर या दौडची सांगता झाल्यानंतर प्रमुख पाहुणे विठू माऊली कन्स्ट्रक्शनचे मालक शंकर रियल सांबरेकर यांच्या हस्ते एसटी पुजनासह श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी दिग्विजय युथ क्लब मण्णूरचे अध्यक्ष सचिन नारायण चौगुले सेक्रेटरी संदीप कदम दीपक सांबरेकर आदींसह क्लबचे अन्य पदाधिकारी सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक वैभव कदम याने तर उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन वैजनाथ चौगुले याने केले. उद्घाटनाचा सामना रॉयल किंग मण्णूर आणि मण्णूर सुपर किंग्स यांच्या खेळविला गेला.
मण्णूर मर्यादित सदर स्पर्धा मर्यादित दहा षटकांची असून या स्पर्धेमध्ये एकूण 10 क्रिकेट संघांनी भाग घेतला आहे. संघ आणि संघ मालकांची नांवे अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. मण्णूर कॅपिटल किंग (मालक -मधुकर भैरव चौगुले), सनरायझर्स मण्णूर (विष्णू बाबू चौगुले), रॉयल किंग मण्णूर (संतोष केंचण्णावर), मण्णूर इंडियन्स (लक्ष्मण शंकर चौगुले), मण्णूर वॉरियर्स (वैभव विलास कदम), मण्णूर सुपर किंग्स (अनिल कृष्णा काकतकर), रॉयल चॅलेंजर्स मण्णूर (सुनील शिवाजी मंडोळकर) आणि मण्णूर नाईट रायडर्स (सागर परशराम डोणकरी).
क्रिकेट क्षेत्रात एक दिवशीय सामन्यानंतर आता आयपीएलची क्रेझ आली आहे. बेळगांव तालुक्यातील मण्णूर गावांमध्ये दिग्विजय युथ क्लब आयपीएलचे अनुकरण करताना गेल्यावर्षीपासून या चुरशिने खेळल्या जाणाऱ्या मण्णूर प्रीमियर लीगचे आयोजन करत आहे. मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील या स्पर्धेला क्रिकेट शौकिनांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यापूर्वी याठिकाणी ग्रामीण भागासाठी मर्यादीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात होते.