संयुक्त महाराष्ट्राबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध करत आज बेळगावमधील कन्नड संघटनांनी अजित पवारांचा निषेध व्यक्त केला आहे.
मराठी भाषिक जनता आणि सीमाप्रश्नावर नेहमीच तिरकस नजरेने पाहणाऱ्या आणि कोणत्या ना कोणत्या कारणास्तव थयथयाट करणाऱ्या कन्नड संघटनांना चेव चढला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदरांजली वाहताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख करत बेळगावसह संपूर्ण सीमाभाग संयुक्त महाराष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे विधान केले होते. या त्यांच्या वक्तव्यावर कर्नाटकातील नेत्यांसह कन्नड संघटनांनी निषेध नोंदविला असून बुधवारी राणी चन्नम्मा चौकात अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. यासोबतच महाराष्ट्र सरकारविरोधी घोषणाही केल्या.
अनेक वर्षे लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नी लढा देणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र पाठीशी उभा आहे. मराठी भाषिकांवरील कर्नाटक सरकारची दडपशाही आणि अन्यायाला आता विस्तृत वाचा फुटत असून यावर्षीच्या काळ्या दिनी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने काळ्या फिती बांधून काळा दिन पाळला होता. दंडाला काळ्या फिती बांधून मंत्रालयाचे कामकाज झाले होते. यासोबतच मुंबईत अनेक ठिकाणी कलादिनाचे आचरण करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शिवसेनेने अनेक हुतात्मे दिले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राबाबत मंगळवार दि. १७ नोव्हेम्बर रोजी त्यांच्या स्मृतिदिनी अजित पवार यांनी आदरांजली वाहताना संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न सर्वजण मिळून साकारण्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही निषेध केला असून त्यापाठोपाठ बेळगावमधील कन्नड संघटनांनीही थयथयाट करण्यास सुरुवात केली आहे.