Wednesday, January 8, 2025

/

खानापूर तालुक्याच्या राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने?

 belgaum

समितीच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असणाऱ्या खानापूर तालुक्यात राजकारणाचे वारे वेगळ्या दिशेने वहात जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर तालुक्यातील माजी आमदार अरविंद पाटील यांनी नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. केवळ २ मतांच्या फरकाने या निवडणुकीत आपल्या विजयाची पताका चौथ्यांदा फडकाविणाऱ्या माजी आमदारांच्या पक्ष बदलाची चर्चा रंगत आहे. यासंदर्भात अजूनही माजी आमदारांनी स्पष्टोक्ती दिली नसून त्यांच्या निर्णयावर तालुक्यासह समस्त सीमाभागातील मराठी जनता आवासून पहात आहे.

आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच जिल्हा मध्यवर्ती बँकेतून करणाऱ्या अरविंद पाटील यांना भाजपकडून ऑफर आली आहे. भालचंद्र जारकीहोळी, रमेश जारकीहोळी, आणि दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्र्यांनीही याबद्दल वक्तव्य केले आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपने त्यांना पाठिंबा दर्शविला आणि त्यानंतर अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबद्दलची चर्चा जोरदार रंगू लागली. यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा खमका आमदार भाजप प्रवेश करणार का? याबद्दल जनता संभ्रमावस्थेत सापडली आहे. शिवाय यासंदर्भात कोणत्याही पद्धतीची वाच्यता अरविंद पाटील यांनी केली नाही.

खानापूर मतदार संघात मराठी भाषिक जनतेची संख्या सर्वाधिक आहे. समितीच्या बालेकिल्ल्यात समितीचे नेतृत्व म्हणून अरविंद पाटील यांना ओळखले जाते. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागल्यामुळे खानापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. अरविंद पाटील यांना समितीचे बळ आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या परंतु अनेकवेळा त्यांनी बोलताना आमदारकीपेक्षाही जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आपले स्थान महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक हे आपल्यासाठी मिळालेले व्यासपीठ असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनेक राजकीय पक्षातील नेते आपल्या स्वतःच्या विविध कार्यक्षेत्राच्या भांडवलावर उभे आहेत. परंतु अरविंद पाटील हे स्वतःच्या भांडवलावर नेतृत्व करणारे नेते आहेत. त्यांना समितीच्या अनेक मातब्बर नेत्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तालुक्यात त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमुळे जरी ओळख मिळाली असली तरी समितीच्या जोरावर तालुक्यात त्यांनी आमदारपदी आपले वर्चस्व सिद्ध केले आणि मराठी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले, हेही तितकेच खरे आहे. समितीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांसमवेत त्यांनी चर्चा केल्या आहेत. तालुक्यातील मराठी जनतेच्या हिताच्या दृष्टीने समितीच्या पदरात आलेली सत्ता आणि त्यानंतर सध्या सुरु असलेली पक्ष बदलाची चर्चा यामुळे खानापूर तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.Arvind patil

सध्या सीमाप्रश्न अंतिम वळणावर येऊन ठेपला असता, समितीमधील अनेक ज्येष्ठ नेते हे आधीच राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला गेले आहेत. परंतु या पाठीपाठ आता तालुक्यातील नेतेही अशाच पद्धतीने राष्ट्रीय पक्षांकडे मोर्चा वळविणार असतील, तर अनेक सर्वसामान्य मराठी जनतेचा प्रक्षोभ उडेल, हे मात्र नक्की आहे. ज्यापद्धतीने अरविंद पाटील यांना तालुक्यात मध्यवर्ती बँकेमुळे ओळख मिळाली त्याचपद्धतीने ती ओळख टिकवून ठेवण्यासाठी त्यांना समितीचा आश्रय लाभला हे नाकारता येणार नाही. शिवाय अरविंद पाटील यांचे भाजपाव्यातिरिक्त महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. या निवडणुकीत त्यांना अनेकांचे मूक समर्थन मिळाले परंतु ते समर्थन त्यांच्या सहकार क्षेत्रातील कारकिर्दीमुळे मिळाले हे स्पष्ट आहे. याचबरोबर त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी केवळ मराठी जनताच समर्थन जाहीर करणार हेही तितकेच खरे आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी आणि सवदिंनी केलेल्या भाजप पक्ष प्रवेशाबद्दल अरविंद पाटील यांना अनेक प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. परंतु अरविंद पाटील यांनी आतापर्यंत एकदाही आपली भूमिका स्पष्ट केली नसून ‘नरोवा कुंजरोवा’ भूमिका ठेवली आहे. तालुक्यासह संपूर्ण सीमाभागात माजी आमदार अरविंद पाटील यांच्या पक्ष बदलाबाबत उलट सुलट चर्चा रंगल्या असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तालुक्यातील वर्चस्वाबबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक तर झाली आता राजकीय पातळीवरील आणि प्रामुख्याने खानापूरच्या राजकीय पातळीवरील चर्चाना पूर्णविराम देण्यासाठी माजी आमदार अरविंद पाटील यांनी या गोष्टींवरील पडदा उघडणे हे महत्वाचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.